Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना ९ फेब्रुवारी रोजी गोविंदबाग येथून पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कफचा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर, त्यांना पुढचे ५-६ दिवस रुग्णालयात उपचारार्थ ठेवण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. दरम्यान, आज रुबी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शरद पवारांच्या प्रकतीबाबत माहिती दिली आहे.

रुबी रुग्णालयाचे डॉक्टर म्हणाले, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधार झाला आहे. आपण त्यांना अँटबायोटिक्स देत आहोत. त्यांची फिजिओथेरपी सुरू केली आहे. त्यांना अँटिबायोटिक्ससाठी एक दोन दिवस ठेवणार आहोत. बाकी सर्व पॅरामीटर्समध्ये सुधारणा झाली आहे. “रूटीन तपासण्यांत इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं होतं. पण अँटिबायोटिक्सने सुधारणा झाली आहे. स्ट्रेसमुळे, लोकांच्या संपर्कात आल्याने इन्फेक्शन झालं होतं”, असंही डॉक्टर म्हणाले.

“शरद पवारांना आता काही त्रास होत नाहीय, साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल झाले असून पुढील दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात येणार आहे, असंही डॉक्टर म्हणाले. दरम्यान, रुबी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टर काय म्हणाले होते?

रुबी हॉल रुग्णालयाचे डॉक्टर लोढा म्हणाले होते की, शरद पवारांना थकवा आला आहे. त्यांना छातीत कफ झाला आहे. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. शरद पवारांची प्रकृती स्थिर आहे. तपासण्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. शरद पवारांना किती दिवस रुग्णालयात रहावं लागेल याचा निर्णयही या अहवालानंतरच घेतला जाईल. शरद पवारांची प्रकृती आत्ता स्थिर आहे. काळजी करण्यासारखं आत्ता तरी काही नाही. शरद पवार यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेलं नाही.

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं होतं?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबांना खोकला आहे, छातीत कफ झाला आहे. पाच दिवस त्यांना औषध घ्याला सांगितलं आहे. बाकी सगळ्या चाचण्या केल्या त्या सामान्य आहेत. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा आणि आधार यासाठी मी तुमची आभारी आहे.” या आशयाची पोस्ट सुप्रिया सुळेंनी केली होती.