Sharad Pawar to be discharged from hospital: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना गेल्या पाच दिवसांपूर्वी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पवार यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. आता उपचारानंतर रुबी रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती दिली आहे. पवार यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल डॉक्टर काय म्हणाले? जाणून घ्या…

डॉक्टर काय म्हणाले?

शरद पवारांना आज (ता. १४) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पवारांची तब्येत आता उत्तम आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांनी दिली आहे. तसेच शरद पवारांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तीन चार दिवस विश्रांती घेतल्यानंतर पवार प्रवास करून शकतात, असंही डॉक्टरांनी सांगितले. डिस्चार्जनंतर शरद पवार पुण्यातील मोदीबागेत पोहचले आहे. मोदीबागेतील निवासस्थानी ते पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

शरद पवारांना काय झाले होते?

रुबी हॉल क्लिनीक येथील डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, “आज आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, शरद पवार यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाली आहे. आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र, पुढील काही दिवस त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला होता. त्या संसर्गावर प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) देण्यात आली असून त्याचा चांगला परिणाम झाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे. डॉक्टरांच्या मते, ते दोन ते तीन दिवसांनंतर प्रवास करू शकतील.”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शरद पवारांच्या तब्येतीलबद्दल आणि रुग्णालयातून दिलेल्या डिस्चार्जबद्दल माहिती दिली आहे. सध्या शरद पवारांची तब्येत बरी असून त्यांना डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे. तीन-चार दिवस आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती सुळे यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिली.

बारामतीत असताना तब्येत खालावली होती

पाच दिवसांपूर्वी शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवारांचे पुतणे श्रीनिवास पवार यांनी सांगितले होते की, शरद पवार यांना होणारा कफचा त्रास रविवारी रात्रीपासून वाढला आहे, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णलयातील उपचारानंतर त्यांना आज घरी सोडण्यात येणार आहे.