राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मुंबईतील निवासस्थानी परतल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासण्यासाठी त्यांना दाखल केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर सांगितलं. दरम्यान डॉ. प्रतीत समदानी यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

शरद पवारांची प्रकृती कशी आहे ?

शरद पवार यांना कफाचा त्रास होतो आहे. तसंच श्वसन मार्गाचा संसर्ग (Respiratory Infection)झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्राँकाटियसारखा त्रास झाला आहे, तसंच खोकला आणि कफही आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती ब्रीचकँडी डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. शरद पवारांच्या प्रकृतीवर डॉक्टर्सचं पथक लक्ष ठेवून आहे. डॉ. प्रतीत समदानी हे त्याच पथकाचा भाग आहेत. त्यांनीच ही माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळेंची पोस्ट काय?

सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “पुढील तपासण्यांसाठी बाबांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या सदिच्छांबद्दल आभारी आहोत.”

२ नोव्हेंबरला बिघडली शरद पवार यांची प्रकृती

शरद पवार यांना खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने सोमवारी (२ नोव्हेंबर) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. येथील उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ के. ग्रँट यांनी दिली होती. शरद पवार २ नोव्हेंबरपासून दुष्काळ दौराही करणार होते पण त्यांची प्रकृती बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला.

पवार कुटुंबीयांचा दिवाळी पाडवा यंदा साजरा होणार नाही

दिवाळीनिमित्त दरवर्षी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये एकत्र येत असतात. सर्व पिढ्याचे सदस्य दिवाळीनिमित्त एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. तसेच पाडव्याच्या दिवशी शरद पवार राज्यभरातील हितचिंतक, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यात अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती विठ्ठल मणियार यांनी रुबी हॉल रुग्णालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना दिली. शरद पवारही दिवाळीत बारामती ऐवजी मुंबईत थांबतील, असेही ते म्हणाले.