भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं काल निधन झालं. या हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या १४ पैकी १३ जणांनी आपला जीव गमावला असून या दुर्घटनेतून वाचलेले गृप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर उपचार सुरू आहे. रावत यांच्या निधनाबद्दल देशभरातून दुःख व्यक्त केले जात असून सर्व नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या सोबतच पवारांनी आपल्यासोबत घडलेला अशाच पद्धतीचा एक किस्साही सांगितला आहे.
यावेळी आपला एक थरारक अनुभव सांगताना शरद पवार म्हणाले, “माझा व्यक्तिगत एक अनुभव आहे. मी मुख्यमंत्री असताना एका दिवशी पुण्यावरून मुंबईला हेलिकॉप्टरने चाललो होतो आणि पुणे-मुंबई रस्त्यात खंडाळा-लोणावळा हा जो परिसर आहे. तिथे एक मोठी दरी आहे. त्या दरीतून आम्ही प्रवास करत असताना, अतिशय ढग होते, सोसाट्याचा वारा होता. पुढचं काही दिसेना आणि आजूबाजूला जंगल होतं. त्यावेळी आमचा पायलट देखील गडबडला. कुठे हेलिकॉप्टर जाईना, पुढचं काही दिसेना. तातडीने एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की आजूबाजूला जो डोंगरी भाग आहे. जर इथे कुठे आदळलं तर हा शेवटच. पण मला महाराष्ट्राची भौगोलिक माहिती आहे, त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त उंच ठिकाण कळसूबाई शिखर आहे, की जे पाच हजार फुटांचं आहे. मी पायलटला सांगितलं की सात हजार फुटावर तू हॅलिकॉप्टर घे आणि सात हजार फुटावर गेल्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो” .




शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना जनरल बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पवार म्हणाले, “ही अत्यंत धक्कादायक अशाप्रकारची बातमी आहे. एका दृष्टीने देशाचा लष्करप्रमुख आणि त्याच्यासोबत काही वरिष्ठ अधिकारी यांना या पद्धतीचा मृत्यू येणं. ही अतिशय चिंताजनक अशाप्रकारची गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे जे हेलिकॉप्टर वापरलं ते अतिशय उच्च दर्जाचं हेलिकॉप्टर होतं. त्या हेलिकॉप्टरचा एकंदर दर्जा याबद्दल काही चर्चा होऊ शकत नाही. मात्र केवळ मशीन चांगलं असून चालत नाही, परिस्थिती देखील कशी आहे याकडे दुर्लक्ष करता येत नाही”.