Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.

नियोजित दुष्काळी दौरा रद्द

शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळी दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांचे सततचे दौरे आणि कामाचा व्याप पाहता त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं?

“बाबांना खोकल्याचा त्रास जाणवल्यामुळे त्यांना पुण्यातील ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्यांची सर्व आरोग्यविषयक हेल्थ पॅरामीटर्स स्थिर आहेत. तुमच्या सर्वांच्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद”, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शरद पवार यांचे सर्व हेल्थ पॅरामीटर्स स्थिर असल्याचं सांगत काही काळजी न करण्याचं आवाहन केलं आहे.