राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यातील दुष्काळी दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याचा दुसरा दिवस असून बारामती आणि दौंड येथील शेतकऱ्यांना ते भेटणार आहेत. दरम्यान, आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. ३ नोव्हेंबर रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला येणार आहेत. हा कार्यक्रम आधी या महिन्यात नियोजित होता. परंतु, कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलली असून मोदीही या कार्यक्रमाला येणार आहेत.

शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये ९ फुटी आणि ४ टन वजनाचा गौतम बुद्धांचा पुतळा नक्षत्र गार्डनमध्ये उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठीच ते बारामती येथे येणार असून याबाबत पंतप्रधान कार्यालयाने पत्रव्यवहार केला आहे.

दरम्यान, गौतम बुद्धांच्या पुतळ्याबरोबर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांसह १३ महामानवांचे चित्रही येथे असणार आहेत. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रमुखांना कार्यक्रमांचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

कशी असेल कार्यक्रमाची रुपरेषा?

विद्या प्रतिष्ठान येथे गौतम बुद्ध यांचा पुतळा आहे, तिथे सर्वजण येतील. पेंटिंग पाहतील. कृत्रिम बुद्धिमत्ता याबाबत काम करणारे विद्यार्थ्यांना सगळेजण भेटतील. त्यांच्याशी बोलतील. मुलांनी स्टार्टअप केलं आहे, त्या मुलांना भेटतील. यानंतर सगळे नेते मैदानात येतील, तिथं ११.४५ मिनिटांनी कार्यक्रम सुरू होईल. संस्थेचे उपाध्यक्ष प्रभूणे बोलतील, त्यानंतर माझं बोलणं होईल, मुख्यमंत्री बोलतील, पंतप्रधान बोलतील. १२.१० मिनिटांनी पंतप्रधान त्यांच्या कार्यक्रमाला जातील”, अशी माहिती देत शरद पवारांनी कार्यक्रमाची रुपरेषा दिली.

बातमी अपडेट होत आहे