Sharad Pawar on NCP Merger : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते विलीनकरणासाठी सकारात्मक असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी मात्र विलीनीकरणाकरता विरोध दर्शवला आहे. तसंच, स्थानिक निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्र आले होते, विलीनीकरणासंदर्भात अजित पवार काही बोलले नव्हते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात आज शरद पवारांनाही प्रश्न विचारण्यात आला.
शरद पवार आज पुण्यातील मोदी बागेतून बारामतीसाठी रवाना झाले. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला. विलीनीकरणासंदर्भात दादा बोललेच नव्हते असं प्रफुल पटेल म्हणालेत, याबाबत विचारलं असता शरद पवारांनी हात जोडले. विलीनीकरणासंदर्भात बोलण्यास शरद पवारांनी स्पष्ट नकार दिला.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार? या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? तसंच, या पक्षाचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनकरण होणार का? हे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत. त्यातच, १२ फेब्रुवारी रोजी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, असा दावा शरद पवारांनी केला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याकरता शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली असल्याची माहिती शरद पवारांच्या गटातील अनेक नेते देत आहेत. परंतु, विलीनकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांच्या गटातील नेते बोलत आहेत. त्यातच, आज शरद पवारांना यासंदर्भात विचारण्यात आल्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. परिणामी यासंदर्भातील खुलासे आता येत्या काळातच स्पष्ट होतील.
प्रफुल पटेल यांनी अध्यक्षपदाबाबत काय म्हटलं आहे?
“आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. पक्षाचा निर्णय योग्य पद्धतीप्रमाणे होईल. आम्ही सगळेच योग्य निर्णय घेऊ. आम्ही सुनेत्रा पवार यांच्याबाबत निर्णय घेतला आहे. त्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. पक्षाचाही निर्णय लवकरच घेतला जाईल. बाहेरचे सगळे लोक आमच्या पक्षाबाबत काय बोलत आहेत? ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही असे लोक का बोलत आहेत? १९५२ पासून माझ्या वडिलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं. मलाही निवडणुकीत लोकांनी निवडून दिलं. आमच्या बद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कुणी कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून बसलो आहे. पक्षाचा निर्णय योग्य दिशेने होईल, योग्य व्यक्तीचा होईल आणि माझ्या शिवायच होईल. अजून काय सांगायचं आहे?” असा सवाल प्रफुल पटेल यांनी केला आहे.

