सातारा : जी कामे भाजप महायुतीच्या कालावधीत झाली, ती शरद पवारांच्या प्रदीर्घ राजकीय कालावधीत का होऊ शकली नाहीत, याचा विचार जनतेने करायला हवा. पवारांनी आजवर केवळ राजकारण केले. राज्याला विकासापासून कायम दूर ठेवत स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यात जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम पवारांनी केल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे बोलताना केला. अनेक वर्षे केंद्र आणि राज्यातील सत्ता असताना, चार वेळा मुख्यमंत्री असतानाही पवारांच्या कार्यकाळात राज्य मागे पडले. अन्य छोटी छोटी राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली. याला सर्वस्वी पवार जबाबदार असल्याची टीकाही उदयनराजे यांनी यावेळी केली.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्राचे सहप्रभारी अजय जयवाल, रघुनाथ कुलकर्णी, सुनील काटकर, भरत पाटील, वसंतराव मानकुमरे, सुवर्णाताई पाटील, सौरभ शिंदे, ज्ञानदेव रांजणे, संतोष कणसे, रंजना रावत, निशांत पाटील, अशोकराव मोने, गीतांजली कदम, विकास गोसावी, डॉ. अच्युतराव गोडबोले, शंकरराव माळवदे, महेश गाडे, विठ्ठल बलशेठवार आदी सातारा-जावळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : मालवण : राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी वेल्डिंग करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला अटक

शरद पवार यांनी राज्यात कृष्णा खोरे, दुष्काळी जलसिंचन, औद्योगिकीकरण, पाणी प्रश्न, रस्तेविकासापासून महाराष्ट्राला वंचित ठेवले. ते चार वेळा मुख्यमंत्री होते. त्या वेळी केंद्र आणि राज्यामध्ये एकच सत्ता होती. मात्र, त्यांनी राज्यासाठी कोणतेही मोठे विकासाचे काम केले नाही, असे सांगत उदयनराजे भोसले म्हणाले, की त्यांनी केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी राज्यात जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे ठोस काम केले. राज्यात दुजाभाव निर्माण करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांनी पायदळी तुडवला. शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि सतत समाजाला फसविण्याचे काम पवार आजवर करत आले आहेत. सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून स्वतःला आणि स्वतःची हुजरेगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठे केले, असा आरोपही उदयनराजे यांनी केला.

दुसऱ्या बाजुला भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने सर्व समाजाला एकसंध आणि सर्व समाजाचे कल्याण करण्याचे काम केले. युवकांपासून वृद्धांपर्यंत आणि महिलांसाठी अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. शरद पवारांनी फक्त निवडणुकीपुरता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जनतेसमोर मांडला. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केलेे. याबाबत त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आज देशातील अन्य छोट्या राज्यातून आलेले नेत्यांनी त्यांची राज्ये विकसित केली, ते नेते वरिष्ठ पदावर गेले. पण हे पवार करू शकले नाहीत. आपल्याकडून हे का घडू शकले नाही, याचा विचार त्यांनी करावा. त्यांनी समाजाची दिशाभूल करू नये. निवडणूक येतील जातील पण समाजात हे विष कालवण्याचे काम केले त्याबद्दल त्यांना भविष्य माफ करणार नाही असा घणाघाती आरोप उदयनराजेंनी या वेळी केला. या वेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भाषण झाले.

हेही वाचा : First List of Congress : वांद्र्यातून असिफ झकारिया तर, मालाडमधून अस्लम शेख; काँग्रेसची पहिली यादी जाहीर? पक्षाने दिलं स्पष्टीकरण!

सातारा मेढा शहर आणि सातारा जावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत. मी किती मतांनी निवडून येणार हे मला माहिती नाही. मी पाच वर्षे लोकांच्या सेवेत आहे. त्यामुळे लोकांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. निवडणूक आल्यानंतर बाहेर पडणारा मी लोकप्रतिनिधी नाही. निवडणूक आली, की अनेक जण फलक लावतात. भावी आमदार असा उल्लेख त्यावर असतो. अशा सर्व भावी आमदारांना माझ्या शुभेच्छा आहेत. कारण ते अगोदरच भावी आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना लोकांच्या मतांची गरज नाही. परंतु नक्की सांगतो, की लोक न्याय करतील.

शिवेंद्रसिंहराजे भोसले (आमदार, सातारा)

Story img Loader