महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महाविकास आघाडीत कायम राहणार की भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होणार, याबाबत विविध राजकीय वर्तुळांत तर्कवितर्क सुरू आहेत.
विशेष म्हणजे, ही चर्चा आता केवळ राजकीय विश्लेषणापुरती मर्यादित राहिलेली नसून पक्षांतर्गतही त्याचे पडसाद उमटत असल्याचं सांगितलं जात आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, पक्षातील जवळपास निम्मे आमदार विरोधी बाकांवर बसण्याऐवजी सत्ताधारी आघाडीसोबत जाण्याच्या बाजूने आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या ‘मौना’मुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चिंता वाढल्याचे चित्र दिसत आहे.
आमदारांचा सत्ताधाऱ्यांकडे कल का?
या अंतर्गत अस्वस्थतेमागे विचारसरणीपेक्षा मतदारसंघातील विकासकामांचा मुद्दा अधिक महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, पक्षातील किमान पाच आमदारांनी नेतृत्वाकडे स्पष्ट भूमिका मांडली आहे.
सत्ताधारी आघाडीत सहभागी झाल्यास मतदारसंघासाठी विकासनिधी मिळवणे, विविध प्रकल्पांना मंजुरी मिळवणे आणि प्रशासकीय कामे मार्गी लावणे अधिक सोपे होईल, अस त्यांचं म्हणनं आहे. त्यामुळे आमदारांनी आता हा प्रश्न आता केवळ राजकीय भूमिकेचा नसून मतदारसंघातील विकासाशी जोडला गेला आहे.
एका वरिष्ठ नेत्याने इंडियन एक्स्प्रेसला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “विरोधी पक्षात राहून सातत्याने संघर्ष करण्यापेक्षा किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीएमध्ये सहभागी होणे पक्षासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते, असे मत पाच आमदारांनी नेतृत्वासमोर मांडले आहे.”
बदलत्या भूमिकेमुळे नाराजी
पक्षाच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे काही लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण मतदानाला गैरहजर राहतो किंवा सरकारला थेट विरोध करण्याचे टाळतो. अशी संभ्रमाची भूमिका घेण्यापेक्षा थेट सत्तेत सहभागी होण्यात काय गैर आहे?”
शरद पवारांचे मौन; जयंत पाटलांचे संकेत
या संपूर्ण घडामोडींवर शरद पवार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच, पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोणतीही औपचारिक बैठकही बोलावण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही एनडीएमध्ये जाण्याच्या शक्यतेबाबत स्पष्ट समर्थन किंवा विरोध व्यक्त केलेला नाही. दरम्यान, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनौपचारिक चर्चांमध्ये पक्षातील जवळपास निम्मे आमदार सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यास अनुकूल असल्याचे मान्य केल्याची माहिती’द इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.
ठाकरे गटातील फुटीनंतर चर्चांना वेग
काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहा लोकसभा खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी आणि प्रशासकीय सहकार्य मिळावे, हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे त्यांनी सांगितले होते.
या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील संभाव्य फुट रोखण्यासाठी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांनाही वेग आला होता. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचे संपूर्ण विलिनीकरण करण्याऐवजी इच्छुक नेत्यांनाच प्रवेश देण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींना दिला आहे.
सध्या विधानसभेत १० आमदार आणि लोकसभेत ८ खासदार असलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे संख्याबळ मर्यादित असलं, तरी दिल्लीतील सत्तासमीकरणात त्याचं महत्त्व वाढलं आहे. आगामी काळात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासारखी महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला छोट्या पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे एनडीए पवारांच्या पक्षाशी जवळीक साधण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे.
गाठीभेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण
गेल्या काही दिवसांत झालेल्या काही महत्त्वाच्या भेटींमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांनी मंत्रिमंडळाची बैठक काही काळ थांबवून पवारांचे स्वागत केल्याची चर्चा होती.
- त्यानंतर जयंत पाटील यांनी भाजप नेते विनोद तावडे यांची भेट घेतली.
- त्याच पाठोपाठ आमदार एकनाथ खडसे यांनीही विनोद तावडे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
“विश्वासार्हतेला धक्का” – संजय राऊत
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आमचे सरकार पाडणाऱ्यांच्या दालनात जाऊन अशा भेटी घेतल्या तर मोठ्या नेत्यांच्या विश्वासार्हतेवर परिणाम होतो. आम्ही त्यांच्या जागी असतो तर अजित पवारांच्या दालनात कधीच गेलो नसतो. शरद पवारांनी कोणता निर्णय घ्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे; मात्र एकनाथ शिंदेंच्या दालनातील भेटीमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत.”
“पवार धर्मनिरपेक्षतेची साथ सोडणार नाहीत” – काँग्रेस
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “भाजप विरोधी पक्षांवर विविध प्रकारे दबाव आणत असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, शरद पवार आपल्या धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी प्रतिमेला धक्का पोहोचेल असा कोणताही निर्णय घेणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे.”
पुढे काय?
शरद पवार यांनी अद्याप या चर्चांवर अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क अधिकच वाढले आहेत. एकीकडे पक्षातील काही आमदारांचा सत्ताधाऱ्यांकडे कल असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्येही अस्वस्थता वाढत आहे. पुढील काही दिवसांत शरद पवार कोणती भूमिका घेतात, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. त्यामुळे या घडामोडीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
