Sharad pawar willpower : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंतच्या जनसंपर्काची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे. शरद पवार हे तळागाळातल्या कार्यकर्त्यालाही नावानिशी ओळखतात, अशी त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांवर अत्यंत जीवापाड प्रेम करणारा नेता म्हणूनही पवारांकडे पाहिलं जातं. दरम्यान, शरद पवारांच्या या स्मरणशक्तीचं रहस्य काय? शरद पवार हे कुणाकडून शिकले? त्यांचा फॉर्म्युला काय? शरद पवारांसारखा मोठे नेता इतक्या सगळ्या लोकांची नावं कशी काय लक्षात ठेवतो. ते लोकांना त्यांच्या नावांनी हाक मारून, त्यांच्याशी व्यक्तिगत संपर्क ठेवतात याचं अनेकांना नवल वाटतं. दरम्यान, ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी स्वत:च याचं रहस्य सांगितलं आहे.

२० वर्षांपूर्वी भेटलेल्या कार्यकर्त्याचं नाव कसं लक्षात ठेवतात

कार्यकर्त्यांसोबतचे शरद पवारांचे अनेक किस्से आपण आतापर्यंत ऐकले आहेत. २० वर्षांपूर्वी भेटलेल्या कार्यकर्त्याचंही नाव त्यांच्या लक्षात असतं. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला. शरद पवार यांची नुकतीच पुण्यातील जुन्नर येथे एक सभा होती. त्यावेळी शरद पवार त्यांच्या भाषणाला सुरुवात करणार इतक्यात एका कार्यकर्त्यानं ‘पवारसाहेबांचा विजय असो…’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…’ अशा घोषणा दिल्या. गर्दीतून ज्या दिशेनं आवाज आला तिकडे बोट दाखवत शरद पवार म्हणाले, “हे कोंढाजी वाघ आहेत ना?” त्यावर उपस्थितांकडून होकारार्थी उत्तर मिळालं. शरद पवारांची स्मरणशक्ती पाहून उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

नेमकं रहस्य काय; शरद पवारांनीच दिलं उत्तर

तर, यामागचं नेमकं काय रहस्य आहे? कार्यकर्त्यांची नावं तुम्ही कशी लक्षात ठेवता, या प्रश्नावर शरद पवार म्हणतात, “काही काही गावांत काही ठरावीक लोकांची भूमिका एक चमत्कारिक असते. तेव्हा तुम्ही एकदा-दोनदा-तीनदा पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. माहीत नाही; पण मी सहसा नाव विसरत नाही.” पुढे शरद पवारांनी ते मुख्यमंत्री होते तेव्हाचा किस्सा सांगितला. “पवारांना भेटायला त्यांच्या मतदारसंघातल्या एक कार्यकर्त्या काही कामासाठी भेटायला आल्या. शरद पवारांनी त्यांना बसायला सांगितलं आणि पहिला प्रश्न विचारला. ‘काय सुलोचना, काय चाललंय’? काय सुलोचना, या विचारणेतून तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, तो विचारूच नका. एका वाक्यानं ती कार्यकर्ती भारावून गेली. इतकी की, ती ज्या कामासाठी आली होती, ते कामच विसरली. ती गावी गेली. सगळ्यांना सांगायची की, माझं काम होवो न होवो… पण, साहेबांनी मला सुलोचना म्हणून हाक मारली. तिला त्याचं प्रचंड कौतुक वाटलं. पुढे ते सांगतात “यशवंतराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनाही तळागळातील कार्यकर्त्यांची नावं लक्षात असायची.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> देशाच्या राजकीय इतिहासातील ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? मग या पाच प्रश्नांची उत्…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्यकर्ते यांच्यातील नात्यांबद्दल अनेक गोष्टी आणि किस्से आतापर्यंत ऐकायला मिळाले. शरद पवार कुठल्याही दौऱ्यानिमित्त राज्यात गेल्यानंतर प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला त्याच्या नावानिशी ओळखतात, असं वारंवार बोललं जातं, अनेक वेळा त्याचा प्रत्ययही आला. दरम्यान, आज शरद पवार यांनी स्वत:ही यावर उत्तर दिलं.