तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत. पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट होणार आहे.ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. गेल्या काही दिवसांतल्या ममता बॅनर्जींच्या भेटीगाठी या काँग्रेसला बाजूला ठेवून होताना दिसत आहेत. त्याचबरोबर घटकपक्षांना फटका बसू नये याचीही काळजी घेताना बॅनर्जी दिसत आहेत. काही काळापूर्वीच आपण उत्तरप्रदेशातून लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे त्या तिथला घटक पक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाची मदतच करताना दिसत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी सक्रीय असल्याचं चित्र आहे. शरद पवारांसोबतची भेट हा त्याचाच महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. अवघ्या काही दिवसांपूर्वीच बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्याआधी ममता बॅनर्जी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्यासाठी सज्ज होत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून यात शरद पवारांच्या भेटीचं देखील नियोजन करण्यात आलं. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी नव्या आघाडीच्या तयारीत तर नाही ना? अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा – “…तर भाजपाचा पराभव करणं सोपं”, ममता बॅनर्जींनी मुंबईत दिले भाजपाविरोधी आघाडीचे संकेत!

ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुंबई दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या भेटीचं देखील नियोजन केलं होतं. मात्र, उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीच्या कारणामुळे ही भेट रद्द करावी लागली. त्यांनी आदित्य ठाकरे तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर काही दिवसांनी ममता बॅनर्जी राजस्थानच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी याआधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर तृणमूल काँग्रेसला प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जात आहे. तसेच, २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांची मोट बांधायला त्यांनी सुरूवात केल्याचा तर्क त्यांच्या भेटीगाठींवरून लावला जात आहे.