Sharad Pawar Meet Sunetra Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. बारामती येथे विमान लँड होत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अजित पवारांचं अपघाती निधन झालं असलं तरीही आजही महाराष्ट्रातील जनतेला यावर विश्वास बसत नाहीय. दरम्यान, अजित पवारांचे काका आणि देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी आज अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवारांची बंधू श्रीनिवास पवार, भगिनी तसेच आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार आणि प्रतिभा पवार उपस्थित होते. संपूर्ण पवार कुटुंबाने आज सांत्वन भेटीला आलेल्या कार्यकर्त्यांचीही आज भेट घेतली. आज सायंकाळपासून सहयोग बंगल्यावर पवार कुटुंब एकत्र आलं आहे.
शरद पवार आज खूप वर्षांनी सहयोग सोसायटी येथे दाखल झाले. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर शरद पवारांनी पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवार राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात सकारात्मक होते, असा दावा शरद पवारांच्या गटाकडून केला जातोय. मात्र, हा असा कोणताही निर्णय झाला नव्हता, यावर अजित पवारांचे नेते ठाम आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपालाही विश्वासात घ्यावं लागेल असा सूर आवळला जात आहे. त्यामुळे शरद पवारांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. माझा उल्लेख करण्याचा देवेंद्र फडणवीसांना कोणी अधिकार दिला अशा थेट प्रश्नच शरद पवारांनी केला. त्यातच, आज सकाळी विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकलात सेंट्रल हॉलमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक झाली होती.
संपूर्ण पवार कुटुंबीय सहयोग बंगल्यावर
अजित पवारांचे स्मारक विद्या प्रतिष्ठान येथे बनवण्यासंदर्भात ही बैठक असल्याचं समोर आलं आहे. या बैठकीनंतरच शरद पवार सहयोग सोसायटी येथे येऊन अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवारांचं सांत्वन करून आलेल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय आज सहयोग बंगल्यात हजर होते.

