Sharad Pawar Slams Narendra Modi vs Jawaharlal Nehru comparison: “पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यापूर्वी देशाला संघटित करण्याचे आणि इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचे ऐतिहासिक काम केले. नेहरू हे नेहरू होते, त्यांच्या कर्तृत्वाची आणि देशाच्या इतिहासातील त्यागाची बरोबरी इतर कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे नेहरू आणि मोदी यांची तुलना करणे पूर्णपणे अशक्य आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेवर वक्तव्य केले आहे. पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालत काँग्रेस, नेहरू आणि गांधी घराण्याच्या देशासाठीच्या ऐतिहासिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला.
जाहिरातबाजीवरून टोला आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक
सध्याच्या राजकीय जाहिरातबाजीवर जोरदार निशाना साधताना शरद पवार म्हणाले, “आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाची जाहिरात ‘टाईम्स ऑफ इंडिया’सह प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली आहे. अशा पहिल्या पानावरील जाहिरातींची किंमत किती अथांग असते, हे सर्वांना माहीत आहे. म्हणूनच आपण कधी त्या रस्त्याने गेलो नाही. मात्र, आजच्या कार्यक्रमाला झालेली कार्यकर्त्यांची विराट उपस्थिती हे स्पष्ट करते की, ही जाहिरात केवळ कागदावर मर्यादित राहिलेली नाही, तर ती सर्वांच्या मनामनात पोहोचली आहे.”
“सत्ता असो वा नसो, तुम्ही कार्यकर्त्यांनी त्याची कधीही चिंता केली नाही. अनेकांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात घालवला आहे. सत्ता असली की आपण सत्तेच्या माध्यमातून काम करतो, आणि सत्ता नसेल तर थेट लोकांमध्ये जाऊन काम करतो, हीच आपली खरी परंपरा आहे,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले.
पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा आणि नेहरूंशी तुलना
देशाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले की, आज सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, महिला आणि अल्पसंख्याक अशा विविध घटकांच्या समस्यांनी देशाला ग्रासले आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नांवर किती आस्था आहे, यावर भाष्य न केलेलेच बरे. काही लोक सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशात असा एखादा नेता पूर्वी झालाच नाही.
“नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि पंतप्रधानपद हे एक संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखणे हे प्रत्येक भारतीयाचे काम आहे. आम्ही धोरणात्मक गोष्टींवर नक्कीच टीका करू, पण या सर्वोच्च पदाचा अनादर कधीही करणार नाही,” असे सांगत पवारांनी नेहरूंशी चाललेल्या तुलनेवर आक्षेप घेतला.
ते म्हणाले, “मोदीजींना अधिक काळ पंतप्रधानपद मिळाले ही चांगली गोष्ट आहे, त्यांच्या चाहत्यांची ती इच्छा असू शकते; पण ही स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? पंतप्रधान होण्यापूर्वी नेहरूंनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ संघर्ष केला, अनेक वर्षे तुरुंगवास सोसला आणि इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यात मोलाची कामगिरी बजावली, हा इतिहासाचा भाग कोणीही विसरू शकत नाही.”
नेहरू-गांधी कुटुंबाच्या त्यागाचा विसर पडू देऊ नका
मंत्रिमंडळातील काही नेत्यांकडून नेहरू आणि गांधी कुटुंबावर होणाऱ्या टीकेचा शरद पवारांनी समाचार घेतला. रशिया दौऱ्यावरील इंदिरा गांधींच्या एका ऐतिहासिक आठवणीला उजाळा देत ते म्हणाले:
“इंदिरा गांधी जेव्हा मॉस्को विमानतळावर उतरल्या, तेव्हा त्यांच्या स्वागताला त्यांच्या दर्जाचा कोणताही रशियन नेता उपस्थित नव्हता. देशाच्या प्रतिष्ठेशी कधीही तडजोड न करणाऱ्या इंदिराजींनी तात्काळ तत्कालीन भारतीय राजदूत आई. के. गुजराल यांचे घर गाठले आणि तिथल्या लहान मुलांसोबत खेळणे पसंत केले; मात्र स्वागताचा प्रोटोकॉल न पाळणाऱ्या रशियन अध्यक्षांची वाट पाहत त्या थांबल्या नाहीत. अशी देशाची प्रतिष्ठा त्यांनी जगात वाढवली होती.”
पंजाबमधील शिखांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करणाऱ्या मंत्र्यांना उत्तर देताना पवार म्हणाले की, “नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी देशासाठी अहोरात्र काम केले, पाकिस्तानला धडा शिकवला. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या अखंडतेसाठी स्वतःच्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले आहे. या कुटुंबाचा त्याग कोणीही विसरू शकत नाही.”
शेतकरी संकट आणि महागाईवरून सरकारवर टीका
देशातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, आज देशात महिलांवरील अत्याचार आणि महागाईसारख्या गंभीर समस्या कमालीच्या वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण-इस्रायल युद्ध सुरू असल्याने त्याचेही आर्थिक परिणाम देशावर जाणवत आहेत.
“आज देशाचा अन्नदाता म्हणजेच शेतकरी प्रचंड संकटात आहे. देशाच्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे, पण आज शेतकऱ्यांना खतांच्या एका गोणीसाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते एका संस्थात्मक पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे,” असे आवाहन पवार यांनी केले.
पुढील ८-१० दिवसांत आंदोलनाची रणनीती ठरणार
सामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच तत्पर राईल, अशी ग्वाही देत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आगामी काळातील संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. भाषणाचा शेवट करताना त्यांनी एक मोठी घोषणा केली:
“पुढील ८ ते १० दिवसांत आपण सर्व प्रमुख नेते एकत्र बसणार आहोत. देशातील विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून सरकारला जाब विचारण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाईल.”
