सांगली : मुसळधार पावसाने पेरण्या झाल्या नसलेल्या गावातील त्या क्षेत्राचे पंचनामे करून राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्यावतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन इस्लामपूर तहसीलदारांना देण्यात आले.
जून महिन्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत आणि पेरण्या करण्यास वेळच मिळाला नाही. अहिरवाडी, गाताडवाडी, तुजारपूर, लोणारवाडी आदी काही गावांत ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना पेरण्या करता आलेल्या नाहीत. शेतकरी आपल्या शेतात पेरणीच करू शकला नाही, तर त्याला उत्पन्न काय मिळणार? त्याचा घर-प्रपंच कशावर चालणार? मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा दवा-पाणी खर्च तो कशातून करणार? शेतकरी उद्ध्वस्त होईल. म्हणून राज्य सरकारने ज्यांच्या पेरण्या आलेल्या नाहीत त्यांच्या शेताचे तातडीने पंचनामे करून सरकारच्या नियमानुसार या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
वाळवा तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांना नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील, अहिरवाडीचे युवा कार्यकर्ते शशिकांत कदम यांच्या हस्ते मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सुनील कदम, अमर भोसले, सत्यजित कदम, सचिन चव्हाण, तसेच राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष संभाजी जाधव, राजारामबापू बँकेचे संचालक संभाजी पाटील, युवक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सचिन पाटील, शकील जमादार प्रामुख्याने उपस्थित होते.