आज शशिकांत शिंदे यांनी सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. बारामती आणि राहुरी या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडणार आहे. त्याबाबत शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांशी चर्चा केली. ज्यानंतर शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष बारामतीची पोटनिवडणूक लढणार नाही हे पुन्हा एकदा जाहीर केलं आहे. २८ जानेवारीला अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला. बारामती या ठिकाणीच त्यांचं विमान कोसळलं आणि त्यांचा मृत्यू झाला. यानंतर बारामती या ठिकाणी पोटनिवडणूक पार पडणार आहे. २३ एप्रिलला ही निवडणूक होणार आहे.
शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?
“बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत आम्ही अजितदादांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक लढवणार नाही हे स्पष्ट करण्यात आलं आहे. राहुरीच्या बाबतीत आम्ही चर्चा केली आहे. राहुरीबाबत महाविकास आघाडी म्हणून आम्ही काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहोत. अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला तेव्हाच आम्ही निर्णय जाहीर केला होता की बारामतीची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष लढवणार नाही. राहुरीच्या संदर्भात आम्ही मविआच्या नेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. बाळासाहेब थोरात यांच्याशी, हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करु, शिवसेनेशी चर्चा करु त्यानंतर निर्णय घेऊ. प्राजक्त तनपुरे यांच्याशीही आमची चर्चा झाली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. आम्ही चर्चा करुन राहुरीबाबतचा काय तो निर्णय घेऊ. ” असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
२३ एप्रिलला बारामतीची पोटनिवडणूक
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती येथील जागेसाठी २३ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान २३ एप्रिलला निवडणूक पार पडल्यानंतर ४ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
अशोक खरातबाबत काय म्हणाले शशिकांत शिंदे?
अशोक खरात प्रकरण, सीडीआर, व्हिडीओ क्लिप या संदर्भात हे कुणाला लक्ष्य ठेवून केलं आहे की कारवाई संदर्भातलं आहे अशी शक्यता व्यक्त केली होती. अंजली दमानियांकडे सीडीआर कुणी जाणीवपूर्वक पाठवले असतील तर त्याबाबत पोलिसांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. अशा प्रकारचे सीडीआर बाहेर जातात कसे? याबाबत शंका उपस्थित होते आहे. त्यामुळे सरकारने आता याबाबत खुलासा केला पाहिजे असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
