गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशा चर्चांनी जोर धरला होता. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आमदारांची एक बैठक घेतली. त्यामुळेही चर्चांना उधाण आलं होतं.
या घडामोडींच्या दरम्यान शरद पवार यांनी महायुती सरकारचं कर्जमाफी योजनेतील दोन जाचक अटी रद्द केल्याबद्दल कौतुक केलं. त्यामुळे शरद पवार एनडीए बरोबर जाणार का? याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी काय म्हटलं?
महायुती सरकारने कर्जमाफी योजनेतील दोन जाचक अटी रद्द केल्याबद्दल शरद पवार यांनी पोस्ट शेअर करत सरकारचं कौतुक केलं. यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी मंत्री शिरसाट यांना विचारला. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “शरद पवार यांनी एनडीएचं कौतुक केलं, याचा अर्थ राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत.”
शरद पवारांनी सरकारचं कौतुक का केलं?
महायुती सरकारने कर्जमाफी योजनेतील दोन जाचक अटी रद्द केल्याबद्दल शरद पवार यांनी सरकारचं कौतुक केलं. शरद पवार यांनी म्हटलं की, “सततची नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मात्र, सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने २०१९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२५-२६, २०२६-२७ चे पीककर्ज भरण्याची घातलेली अट, यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता. पण राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता आज शासनाने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचे आभार”, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
शरद पवार NDA बरोबर जाणार का? भुजबळांनी काय म्हटलं?
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात एक बैठक घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आता एनडीएचा घटक होईल असं वाटतं का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर छगन भुजबळ म्हणाले की, “शरद पवार हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील बैठकीसाठी विधिमंडळात आले होते, तेव्हा एकनाथ शिंदेंचं दालन जवळचं होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमदारांची बैठक घेतली. एवढाचा त्या मागचा अर्थ आहे. शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते, तसेच ते देशाचे देखील मंत्री होते आणि ते देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणीही रेड कार्पेट टाकतं. मग त्यात चुकीचं काय? त्याचा अर्थ ते इकडे किंवा तिकडे जातील असा होत नाही”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
