राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. यावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात होते. यावर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उबाठा) आणि भाजपा नेत्यांच्याही प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आमदारांची एक बैठक घेतली होती. त्यावरून शरद पवार हे एनडीएबरोबर जाणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण देत या चर्चा फेटाळून लावल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत महत्वाचं भाष्य केलं. ‘शरद पवार एनडीएमध्ये येतील असं मला अजिबात वाटत नाही’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

छगन भुजबळ काय म्हणाले?

शरद पवार यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांच्या दालनात एक बैठक घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष आता एनडीएचा घटक होईल असं वाटतं का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “शरद पवार एनडीएमध्ये येतील असं मला अजिबात वाटत नाही.”

“शरद पवार हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील बैठकीसाठी विधिमंडळात आले होते, तेव्हा एकनाथ शिंदेंचं दालन जवळचं होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमदारांची बैठक घेतली. एवढाचा त्या मागचा अर्थ आहे. शरद पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होते, तसेच ते देशाचे देखील मंत्री होते आणि ते देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी कोणीही रेड कार्पेट टाकतं. मग त्यात चुकीचं काय? त्याचा अर्थ ते इकडे किंवा तिकडे जातील असा होत नाही”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

पक्षांतराच्या चर्चांवरून सुप्रिया सुळेंचा संताप

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदारांबाबतही वेगवेळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे सातत्याने रंगणाऱ्या पक्षांतराच्या चर्चांवरून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, “आमचा ८ खासदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप आहे. आम्हाला रोज टीव्हीवर एका नवीन पक्षात पाठवलं जात आहे. आम्ही त्या ग्रुपवर गंमतीने बोलत असतो. आमच्या ग्रुपमध्ये मी एक जोक पाठवला. कारण आम्हाला ८ जणांना दररोज एका वेगळ्या पक्षात पाठवतात. कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपामध्ये, तर कधी शिवसेनेत. मी काल खासदार भास्कर भगरे सरांना म्हटलं की, आता फक्त मनसेमध्ये आपलं नाव लागलं नाही. अन्यथा बाकी सगळे पक्ष झालेत. आम्ही आपआपसात असं ठरवलं की आता भारतात नको, आता आपण इंटरनॅशनल स्तरावर जाऊया. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ८ खासदार आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करूया, चला अमेरिका. असंच झालंय ना. आता जोक केले जात आहेत, काय दुर्देव आहे. काय चेष्टा मस्करी लावली. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला.