राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे भवितव्य आणि विलीनीकरणाच्या चर्चांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आम्ही कुठेही विलीन होणार नाही; ज्यांना यायचं आहे त्यांनी आमच्यासोबत यावं,” या पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया आता विशेष चर्चेत आली आहे.
विलीनीकरणाच्या सर्व चर्चांना पूर्णविराम
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. महाराष्ट्रातील सध्याची दुष्काळसदृश परिस्थिती, MPSC परीक्षेतील गोंधळ आणि SIR प्रक्रियेशी संबंधित वादावर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. बैठकीदरम्यान पक्षाच्या भविष्याबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम देत शरद पवारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सहभागी होण्याच्या किंवा इतर कोणत्याही पक्षात विलीन होण्याच्या शक्यता पवारांनी थेट फेटाळून लावल्या.
“पवारांच्या वक्तव्यामागील हेतू काय?” – तटकरे नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. पवारांच्या राजकीय टायमिंगचा संदर्भ देत त्यांनी या वक्तव्यावर थेट भाष्य करणे टाळले.
तटकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “साहेबांचे टायमिंग संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. अनेक प्रसंगी त्यांनी साधलेले टायमिंग अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. या विशिष्ट वेळी हे विधान करण्यामागचा त्यांचा नेमका काय हेतू असू शकतो, हे या क्षणी सांगणे कठीण आहे.”
“पवार साहेबांचं टायमिंग सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक वेळा त्यांनी साधलेलं टायमिंग महत्त्वाचं असतं. या वक्तव्यामागचं नेमकं टायमिंग काय असू शकेल, हे त्यांनाच माहीत!” – सुनील तटकरे
