गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यातच आता काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांबाबत एक मोठा दावा केला. ‘शरद पवारांचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षासारखी अवस्था शरद पवारांच्या पक्षाची होऊ शकते’, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. ‘आमच्या पक्षातील कोणीही अस्वस्थ नाही. आम्ही सर्वच्या सर्व खासदार शरद पवार यांच्याबरोबर आहोत’, असं स्पष्टीकरण बजरंग सोनवणे यांनी दिलं. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले?

“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या व्यक्तीने असं वक्तव्य करणं किती योग्य आहे मला माहिती नाही. पण माझ्या पक्षावर बोलले, आमच्या खासदारांबाबत ते बोलले आहेत, त्यामुळे मी एक सांगतो की, आमच्या पक्षातील एकही खासदार अस्वस्थ नाही. आम्ही लोकांचे कामे करत आहोत. आम्ही सर्वच्या सर्व खासदार एकत्रित आहोत. यामध्ये कुठेही बेबनाव नाही किंवा कोणीही अस्वस्थ नाही. मी सर्वांशी संवाद साधतो, त्यामुळे मला हे माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना काय वाटतं, त्यावर मी काही भाष्य करावं असं मला वाटत नाही”, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

“कोणी काही दावा करेल, त्यामुळे ते काय दावा करतात, त्याबाबत त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांना कोण भेटलं? आमच्या खासदारांपैकी किमान ६ खासदारांचा तरी मोबाईल नंबर त्यांच्याकडे असेल का? आमची ओळख तरी पृथ्वीराज चव्हाण यांना असेल का? आम्ही राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व खासदार हे शरद पवार यांच्याबरोबर आहोत. आम्ही १०० टक्के शरद पवार यांची साथ सोडणार नाही. जे असे दावे करतात, त्यांना मी एवढाच सल्ला देतो की त्यांनी आधी आपलं घर सांभाळावं”, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी काय दावा केला?

“चिंताजनक बातमी निश्चित आहे, त्यांचे (शरद पवारांची राष्ट्रवादी) ५ ते ६ खासदार अस्वस्थ आहेत. आता ते खासदार काय करतील माहिती नाही. पण त्यासाठी त्यांच्यामागे मोदी-शाह सरकार हात धुवून मागे लागलेलं आहे. विरोधी पक्ष अस्तित्वातच नसावा अशी त्यांची (मोदी-शाह यांची) इच्छा आहे. जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं केलं तेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही होऊ शकतं”, असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

शरद पवारांच्या ५ ते ६ खासदारांना भारतीय जनता पक्षात घेण्याचा प्रयत्न आहे की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत? असा प्रश्न पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला. यावर उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “मला ते माहिती नाही. मात्र, ते सोडून जाण्याच्या परिस्थितीत किंवा ते अस्वस्थ आहेत, एवढंच मी म्हणत आहे. आता ते सोडून जातील की नाही? हे देखील मला माहिती नाही. मात्र, ते खासदार अस्वस्थ आहेत एवढं मी ऐकत आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं.