महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? यावरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनीही फडणवीसांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यामागचं कारण संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं आहे. तसेच शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीएबरोबर जाणार असल्याच्या या अफवा असून याबाबत आज सुप्रिया सुळे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. या बरोबरच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याबाबतही संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादी (शरद पवार) एनडीएला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आज देशापुढे सर्वात गंभीर प्रश्न कोणता असेल तर तो प्रश्न म्हणजे नीट परीक्षा पेपर फुटीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. हा आमच्यासाठी चिंतेचा विषय असायला हवा. मात्र तुम्ही मला असं सांगत आहात की आम्ही त्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार वैगेरे, शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा आम्ही (शिवसेना ठाकरे) हे या विधेयकाला पाठिंबा देणार हे पूर्णपणे चुकीचं आहे”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे मांडणार भूमिका
“खासदार सुप्रिया सुळे आज १२ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये त्या सविस्तर भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे पत्रकारांनी राष्ट्रवादीबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत सर्व प्रश्न त्यांना विचारू शकता”, अशी माहिती संजय राऊत यांनी सांगितली आहे.
जयंत पाटील आणि फडणवीसांच्या भेटीबाबत राऊत काय म्हणाले?
जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “ही माहिती अर्धवट आहे. माझ्या माहितीनुसार प्रफुल पटेल हे सध्या ज्या ठिकाणी फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे, तेथे ते आहेत. ते कालच्या बैठकीला होते की नाही? याबाबत माझ्या मनात शंका आहे. प्रफुल पटेल हे नेहमी फुटबॉल वर्ल्डकपसाठी परदेशात जातात. त्यामुळे ते यामध्ये नसावेत”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“जयंत पाटील यांनी फडणवीसांची भेट घेण्यामागचं कारण हे त्यांच्या मतदारसंघातील एका नगराध्यक्षाला अपात्र ठरवण्यात आलं. नगराध्यक्ष लोकांमधून निवडून आलेला असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची अपात्रतेची कारवाई करणं चुकीचं आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या माहितीनुसार या प्रकरणाच्या संदर्भाने जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील एक महत्वाचे नेते आहेत. तसेच ते महाविकास आघाडीमधील देखील एक महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांबाबत मला काहीही तथ्य वाटत नाही. मात्र, अशा पद्धतीच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
