मुंबई: राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे फटका बसला होता. लोकसभा निवडणुकीत तुतारी ऐवजी पिपाणीला हजारांपासून लाखांपर्यंत मते तर विधानसभा निवडणुकीत ९ उमेदवार पडल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. लोकसभेपासून पिपाणी हे चिन्ह गोठविण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह वगळले आहे, यामुळे राष्ट्रवादीला (शरद पवार) दिलासा मिळाला आहे.
पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ नाव होते. या नामसाधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाला तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली. आयोगाने आपल्या १९४ मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे.
अपक्षांकडून पिपाणी चिन्हाची मागणी
लाेकसभा निवडणुकीत पिपाणीला मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत अपक्षांकडून पिपाणी चिन्हाची मागणी करण्यात आली होती. विशेषत: शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडशेरी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघात पिपाणीला पसंती मिळाली होती. त्याचप्रमाणे जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा या मतदारसंघांत शरद पवारांच्या पक्षाचा उमेदवार जितक्या मतांनी पाराभूत झाला. त्यापेक्षा अधिक मते पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्षा उमेदवारांना मिळाली होती. ही मते विभाजित झाली नसती तर शरद पवारांच्या पक्षाचे १९ आमदार निवडून आले असते, असा दावा करण्यात आला होता.
लोकसभेत फटका
रावेर, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर, बीड, सातारा या जागांवर पिपाणी या चिन्हांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना हजारांनी मते मिळाली होती. रावेर या जागेवर पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणारे एकनाथ साळुंके यांना ४३ हजार ९५७ मते, दिंडोरीत बाबू भगरे (सर) यांना १ लाख ३ हजार ६३२ मते, भिवंडीत कांचन वखरे यांना २४ हजार ६२५ मते, बारामतीत शेख सोएलशहा यांना १४ हजार ९१७ मते मिळाली. शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना २८ हजार ३२४, अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना ४४ हजार ५९७, बीडमध्ये अशोक थोरात यांना ५४ हजार ८५० मते, साताऱ्यात संजय गाडे यांना ३७ हजार ६२ मते मिळाली होती. सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान प्रतेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उभे राहिले होते. त्यांचा ३२ हजार मतांनी पराभव होऊन उदयनराजे भोसले विजयी झाले.
