Sharad Pawar confirms via a social media update : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाल्याने याठिकाणी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. २३ एप्रिल रोजी येथे पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याकरता आज बारामतीत प्रचारासाठी शेवटचा दिवस आहे. सर्वाधिक मतांनी निवडून येण्याकरता महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेते सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मात्र, यात सुनेत्रा पवार यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार मतदानाकरता येऊ शकणार नाहीत. याबाबत आज खुद्द शरद पवारांनीच माहिती दिली. त्यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात पोस्ट केली आहे.
“मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे”, असं शरद पवार म्हणाले.
अत्यंत नाईलाजास्तव मतदानापासून मी वंचित राहतोय
ते पुढे म्हणाले, “या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.”
सुनेत्रा पवारांना मतदान करा
“आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे”, असंही ते म्हणाले.
“मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो”, अशी माहिती शरद पवारांनी आज दिली.
