आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला अत्यंत साध्या भाषेत मांडण्यासाठी आणि इतिहासाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यांनी व्याख्यानं घेतली आणि या विषया संदर्भातली आस्था नव्या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

आज पहाटे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांच्या निधनाने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, अभिनेते तसंच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवार यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या लिखाणात काही वादग्रस्त मुद्दे होते, मात्र इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याच्या बाबतीतलं त्यांचं योगदान विसरता येणार नाही.

हेही वाचा – “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख…”; पंतप्रधान मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली भावनिक श्रद्धांजली

शरद पवार पुढे म्हणाले, “इतिहासाच्या क्षेत्रात योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यात एका गोष्टीचं समाधान म्हणता येणार नाही पण ते दीर्घायुषी होते. वयाची शंभरी ही यशस्वीपणे आणि सतत लोकांशी सुसंवाद ठेवत पार पाडली. त्यांना लोकांच्या सदिच्छा मिळाल्या असं मला वाटतं. ते आज आपल्यात नाहीत. त्यामुळे त्याबद्दलचं दुःख अनेकांच्या मनात आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्तसुद्धा मुद्दे होते. पण त्यासंबंधीचं भाष्य करण्यासाठी मी जाणकार नाही. कुणीही काहीही मोठी कामगिरी करत आयुष्य खर्च केल्यानंतर काही लोक त्यामध्ये उणिवा लोक काढत असतात, हे बाबासाहेबांच्या बाबतीतही केले गेले. इतिहासासाठी आस्था निर्माण करण्याचं योगदान विसरता येणार नाही”.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाचं दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.