Sharad Pawar on Flydubai Plane Incident: दुबई ते तेल अवीव प्रवास करणाऱ्या ‘फ्लायदुबई’च्या विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाची जगभरात चर्चा होत आहे. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कॅप्टन मच्छार यांनी साहस दाखवत एक मोठी दुर्घटना होण्याचा प्रसंग रोखला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना खरा हिरो म्हटले. तर इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनीही मच्छार यांना नायकाची उपाधी दिली. पंतप्रधान मोदींनीही हा भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले. या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, खासदार शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना स्मित मच्छार यांच्या साहसाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मच्छार यांचे कौतुक करतानाच खबरदारीचा इशाराही दिला.
काय म्हणाले शरद पवार?
“विमान दुर्घटना रोखल्याबद्दल त्यांचे (स्मित मच्छार) अभिनंदनच केले पाहिजे. त्यांनी एवढा मोठा धोका पत्करला. त्यांच्यावर हल्लाही झाला. तिथे काही चूक-भूल झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असती. पण सुदैवाने वैमानिकाने धाडस दाखवले आणि संकटावर मात केली. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे प्राण वाचले. या घटनेच्या खोलात इस्रायल, यूएइ आणि भारत सरकार जाईल आणि तपास करेल. याची मला खात्री आहे. पण जे काही घडले ते चिंताजनक आहे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, “आमच्यासारखे लोक आठवड्यातून चार चार दिवस काही ना काही कामानिमित्त विमानात असतात. आत (कॉकपिट) काय चालले आहे, हे आम्हाला माहीत नसते. पण आत काय चालते, याचे गंभीर उदाहरण जगाने या घटनेच्या निमित्ताने पाहिले. याची नोंद जाणकारांनी घेतली आहे.”
कोण आहेत स्मित मच्छार?
मुळचे गुजरातचे असलेले स्मित मच्छार हे मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे आई-वडील अजूनही चेंबूर येथे राहतात. तर स्मित मच्छार हे नोकरीनिमित्त सध्या दुबईत राहत आहेत. स्मित मच्छार यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ते जून २०२२ पासून ‘फ्लायदुबई’च्या बोईंग ७३७ ताफ्यात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत ‘स्पाईसजेट’ या विमान कंपनीत तब्बल ११ वर्षे सेवा बजावली आहे. स्पाईसजेटमध्ये ते वरिष्ठ कमांडर होते; तसेच नोव्हेंबर २०२० पासून ते ‘लाइन ट्रेनिंग कॅप्टन’ म्हणून इतर वैमानिकांना प्रशिक्षण आणि तपासणीचे काम पाहत होते.
त्यांच्या नावावर ‘बोईंग ७३७-८००’ आणि ‘७३७ मॅक्स ८ व ९’ या विमानांचे ९,७५० तासांहून अधिक उड्डाण नोंदवले गेले आहे. यापैकी ६,४०० हून अधिक तास त्यांनी स्पाईसजेटमध्ये ‘पायलट-इन-कमांड’ म्हणून पूर्ण केले आहे.
हल्लेखोर सह-वैमानिक कोण?
फ्लायदुबईच्या तेल अवीवला जाणाऱ्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ओमानच्या सह-वैमानिकाची ओळख पटली असून त्याचे नाव हमाम अल-हमामी असे आहे. ओमानमध्ये यापूर्वीच त्याच्यावर उड्डाण करण्यास बंदी घालण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे.
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने संबंधित प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हमामने अतिरेकी विचार स्वीकारल्याचा संशय होता, त्यामुळे त्याच्यावर विमान उड्डाण करण्यास बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरही फ्लायदुबईने त्याला नोकरी दिली. असोसिएटेड प्रेसनेही ओमानमधील बंदी आणि त्यानंतर झालेल्या नियुक्तीबाबत अशीच माहिती दिली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सह-वैमानिकावर दहशतवादाचे आरोप लावले आहेत, मात्र त्यासंबंधीचे पुरावे अद्याप त्यांनी दिलेले नाहीत. तपासयंत्रणा यासंबंधीचा तपास करत आहेत.
