Sharad Pawar On Sunetra Pawar Deputy CM : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्या अनुषंगाने मुंबईत राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत, तर दुसरीकडे बारामतीत शरद पवारांच्या निवासस्थानी देखील बैठका सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार या मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज सायंकाळी ५ वाजता त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला पवार कुटुंबातील कोण-कोण उपस्थित राहणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधी कोण-कोण उपस्थित राहणार?
बारामतीत पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला पवार कुटुंबातील कोण-कोण उपस्थित राहणार असा प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले की, “मला माहिती नाही. शपथविधी कधी आहे हे देखील मला माहिती नाही.” असं ते म्हणाले. तुम्ही जाणार आहात का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, “नाही.
दरम्यान, सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आज पार पडत आहे, पण एवढ्या घाईत शपथविधी का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “मला माहिती नाही. पण त्यांच्या पक्षाने जे ठरवलंय तशी परिस्थिती दिसत आहे.”
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत काही चर्चा झाली का?
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा मी ऐकतोय, त्या मुंबईत सुरू आहेत, मी येथे (बारामतीत) आहे. मुंबईत प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. आता प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसत आहे. त्यांच्या आधी-मधी मी भाष्य करणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं.

