ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान यूपीएसंदर्भात केलेल्या विधानाची देशाच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यासोबतच, काँग्रेसला बाजूला सारून देशात विरोधकांची आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं देखील चित्र या दौऱ्यानंतर निर्माण झालं. यासंदर्भात आता काँग्रेसकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात येत असून काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होणं अशक्य असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नेमकी भूमिका काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान त्यांची आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीमध्ये भाजपाविरोधी विरोधकांची नवी आघाडी उभी करण्यावर चर्चा झाल्याचं या दोघांनीही बैठकीनंतर सांगितलं. या आघाडीमध्ये काँग्रेस असेल की नाही? असा प्रश्न यावेळी शरद पवारांना विचारला असता “भाजपाच्या विरोधी सगळ्यांचं आघाडीत स्वागत असेल”, असं सूचक विधान पवारांनी केलं होतं. मात्र, काँग्रेसही आघाडीत असेल, असं ठामपणे मात्र पवारांनी म्हटलं नव्हतं. त्यामुळे त्यावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

“यूपीएच्या बाहेर विरोधकांचे १५० खासदार”

नवाब मलिक यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.”राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आधीपासून स्पष्ट केलं आहे की देशात विरोधकांची मोट बांधायची आहे. पण मोट बांधताना काँग्रेसशिवाय विरोधकांच्या एकजुटीचं काम होऊ शकत नाही. पण काँग्रेससोबतच यूपीएव्यतिरिक्त असलेल्या पक्षांनाही एकत्र आणणं गरजेचं आहे. यूपीएबाहेरच्या विरोधी पक्षाच्या खासदारांची संख्या १५० च्या आसपास आहे. त्यांनाही सोबत आणणं गरजेचं आहे. त्यासाठी आधीपासून सगळ्यांना एकत्र करण्याविषयी शरद पवार बोलत राहिले”, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपाविरोधी राष्ट्रीय आघाडीत काँग्रेस असेल का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…!

“ममता बॅनर्जींचं एकच म्हणणं आहे, की…”

काँग्रेससोबतच विरोधकांची एकजूट होईल, हे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. “आगामी काळात काँग्रेससोबत सर्व विरोधी पक्षांची मोठी आघाडी करण्याचं काम या देशात होईल. त्याचं नेतृत्व कोण करेल, हा आत्ताचा विषय नाही. सामुहिक नेतृत्व राहायला हवं अशी चर्चा आहे. सगळे एकत्र आल्यानंतर कसं पुढे जायचं, ते तेव्हा ठरेल. काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही हे आधीपासून शरद पवार सांगत आहेत. ममता बॅनर्जींचंही एकच म्हणणं आहे की सगळे विरोधक एकत्र केले पाहिजेत. त्या दिशेनं आम्ही काम करू, सगळ्यांचा मोर्चा बांधू आणि देशात एक पर्याय निर्माण करू. २०२४मध्ये निवडणुका होतील, तेव्हा देशात परिवर्तन झालेलं दिसेल”, असं ते म्हणाले.

“ममता बॅनर्जी शरद पवारांना भेटल्या. पण त्याआधीही शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हे सांगितलंय की काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकत नाही. सगळ्यांना एकत्र आणायचं आहे. त्यासाठी शरद पवार काम करत आहेत”, असं देखील नवाब मलिक म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar on opposition party alliance without congress says nawab malik pmw
First published on: 04-12-2021 at 15:28 IST