Sharad Pawar on Parth Pawar : अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या जागेवरून महायुतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते. परंतु, काँग्रेसने अशोक मोरे यांना उमेदवारी देऊन या ठिकाणची निवडणूक निश्चित केली आहे. यावरून पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शरद पवारांनी पार्थ पवारांच्या परिपक्वतेबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पार्थ पवार काय म्हणाले होते?
बारामती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने अशोक मोरे यांना उमेदवारी दिली. याबाबत पार्थ पवार म्हणाले, “बिनविरोधासाठी कोणाबरोबरही बोलणं झालेलं नाही. काय करायचं हे त्यांना कळायला हवं. ते काय करत आहेत हे सर्वांना माहितेय. त्यांना नंतर काय त्रास होईल हे महाराष्ट्रात दिसेल. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काही नशिबात असेल ते होईल. फक्त मला याचं वाईट वाटतंय की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे”, असं पार्थ पवार म्हणाले होते.
दरम्यान, आज तिसऱ्या टर्मची राज्यसभेत सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी दिल्लीतून पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना पार्थ पवारांच्या या वक्तव्याविषयी विचारण्यात आलं. कारण, शरद पवारांनी काँग्रेसच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबाच दिल्याचं स्पष्ट होतंय. शरद पवार स्मितहास्य करत म्हणाले, “राजकारणात वक्तव्ये करण्यासाठी परिपक्वता लागते. ती कितपत त्यांच्याकडे आहे हे मी आज सांगू शकत नाही.”
काँग्रेसच्या भूमिकेबाबत शरद पवार काय म्हणाले?
“काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे, त्यामुळे निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबत जास्त चर्चा करण्याची गरज नाही. तसेच बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊद्या अशी मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर समोर कोणीतरी उमेदवार असेल हे मान्य करूनच निवडणूक लढवावी लागत असते”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का?
सुनेत्रा पवार यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे. पण आता त्यांचा प्रचार तुम्ही आणि सुप्रिया सुळे करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही.”
