तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १४) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळप्रश्नी मोर्चा काढण्यात येणार असून त्याचे नेतृत्व खुद्द पवार करणार आहेत. त्यामुळे ते कोणते निवेदन देतात, हा विषय औत्सुक्याचा असणार आहे. स्थानिक पातळीवरील मागण्या असतील, तर त्यात जिल्हा बँकेचा उल्लेख कसा होतो आणि राज्यपातळीवर मागण्या असतील, तर त्यात सिंचनप्रश्नी ते कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी १९८० मध्ये शरद पवार यांनी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढला होता. त्यांच्या जळगाव ते नागपूर या शेतकरी दिंडीचा उल्लेख राजकीय विश्लेषक आवर्जून करतात.
मोर्चाच्या आयोजनाची माहिती सरकारला मिळाल्यानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला. मोर्चामुळे मराठवाडय़ातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ात अभूतपूर्व दुष्काळी स्थिती आहे. शेतकरी आíथकदृष्टय़ा हतबल झाला, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली. सलग पाच वर्षांपासून आपत्तीला सामोरे जाणारे जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले असताना राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करून पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा या मूलभूत बाबी पुरविण्यात अपयशी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मोर्चाचे नेतृत्व स्वत: शरद पवार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस रामचंद्र पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघेल. सरसकट कर्जमाफी, जनावरांसाठी चारा छावणी, दूध दरवाढ, उसाला एफआरपीप्रमाणे दर, कृषिपंप वीजबिल माफी, मजुरांच्या हाताला काम, रब्बी हंगामाचा पीकविमा त्वरित मिळावा, रब्बी पेरणीसाठी हेक्टरी २५ हजारांची मदत आणि शैक्षणिक सुविधांत माफी आदी मागण्या केल्या जाणार आहेत. खासदार पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांची दखल घेण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी हजारोंच्या संख्येने या लढय़ात सामील होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.