Sharad Pawar On Baramati Assembly Bypoll Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून हालचाली करण्यात आल्या. मात्र, काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे आता बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना मोठं भाष्य केलं आहे. निवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार असल्याचं भाष्य शरद पवार यांनी केलं आहे. तसेच बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसची बोलणार नसल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“काँग्रेस एक राजकीय पक्ष आहे, त्यामुळे निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबत जास्त चर्चा करण्याची गरज नाही. तसेच बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊद्या अशी मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवायची असेल तर समोर कोणीतरी उमेदवार असेल हे मान्य करूनच निवडणूक लढवावी लागत असते”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का?
सुनेत्रा पवार यांना तुम्ही पाठिंबा दिला आहे. पण आता त्यांचा प्रचार तुम्ही आणि सुप्रिया सुळे करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केलेला नाही.”
तुम्ही काँग्रेसशी बोलणार का?
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी तुम्ही काँग्रेसशी बोलणार का? यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “काँग्रेसशी बोलण्याची काही गरज नाही. असं आहे की अनेकजण निवडणूक लढवत असतात. राजकारणात जे लोक असतात ते लोकांची कामे करण्यासाठी असतात. अजित पवार यांच्याबाबत बारामती मतदार संघात एक आदर आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. दुर्देवाने अजित पवार यांचं निधन झालं. याचं दु:ख कुटुंब म्हणून आम्हा सर्वांना आहे. पवार कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
