scorecardresearch

The Kashmir Files:चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे, असंही पवार म्हणाले आहेत.

एकीकडे सध्या आम आदमी पक्ष आणि भाजपा यांच्यात केजरीवाल यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटावर केलेल्या भाष्यावरून घमासान सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर अशा प्रकारच्या चित्रपटाचा आधार घेऊन देशातलं वातावरण विषारी केल्याचा आरोप केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते.

हेही वाचा – ‘सामाजिक वातावरण दूषित करण्याचा भाजपचा प्रयत्न’

‘काश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका पवार यांनी केली. शरद पवार म्हणाले,”मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे”.

काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांमागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार होत्या, असे सांगत पवार म्हणाले की, काश्मीर प्रश्नाला सातत्याने पंडित नेहरूंना जबाबदार धरणे योग्य नाही. काश्मिरी पंडित खोऱ्यांतून बाहेर पडले तेव्हा केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता. मुफ्ती महम्मद सईद हे केंद्रीय गृहमंत्री होते, जगमोहन राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी भाजपच्या तिकिटावर दिल्लीत लोकसभेची निवडणूक लढवली होती, असा शाब्दिक प्रहार पवार यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar on the kashmir files movie criticised bjp vsk

ताज्या बातम्या