‘हे तर शरद पवारांचे दबावतंत्र – माधव भंडारी

शरद पवार यांच्या कामकाजाची आजवरची शैली पाहता त्यांना काँग्रेसला झटके देण्याची सवय आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी-शरद पवार यांच्या गुप्तभेटीचा झालेला

शरद पवार यांच्या कामकाजाची आजवरची शैली पाहता त्यांना काँग्रेसला झटके देण्याची सवय आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी-शरद पवार यांच्या गुप्तभेटीचा झालेला गौप्यस्फोट म्हणजे पवार यांचा काँग्रेसवरील दबावतंत्राचा एक भाग म्हणावा लागेल, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे सांगितले. या भेटीची आपल्याला कल्पना नसल्याचे स्पष्ट करीत कुठलीही छुपी युती न करता भाजप निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागाच्यावतीने शुक्रवारी सोशल मीडिया प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत भंडारी यांनी मनसेच्या टोल विरोधी आंदोलनाची खिल्ली उडविली. आगामी निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेकाप, रिपाई यांच्यासह कमीतकमी मित्र पक्ष घेऊन बहुमताने दिल्लीत सत्तेत येण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुठलाही भागीदार न जोडता तसेच छुपी युती न करता भाजप निवडणुकीस सामोरा जाणार असल्याचे त्यांनी उपरोक्त भेटीवरून उपस्थित झालेल्या प्रश्नावर सांगितले. मनसेच्या टोल नाका विरोधी आंदोलनाची त्यांनी खिल्ली उडविली.
गेल्या काही दिवसांत जनाधार आपल्या हातातून गेल्याचे मनसेच्या लक्षात आले आहे. यामुळे जनाधार मिळवण्यासाठी राज्यात सध्या टोलनाका तोडफोड आंदोलन सुरू आहे. तथापि, राज ठाकरे आणि राज्य शासन यांची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आधी टोलचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगण्यात येत होते. असे असताना अचानक हे आंदोलन कशासाठी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्य शासनाने राज ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sharad pawar only trying to pressurise congress madhav bhandari

ताज्या बातम्या