Sharad Pawar On Asha Bhosle : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आज (१२ एप्रिल २०२६) अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असं वाटत होतं. मात्र, त्यांनी आज अखेरचा निरोप घेतला. आशा भोसले यांनी मराठी, हिंदीसह अनेक भाषांतील गाणी गायली आहेत. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत आशा भोसले यांना आदरांजली अर्पण केली आहे. ‘आशाताईंचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील’, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
शरद पवार यांनी काय म्हटलं?
“आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताईंनी प्रत्येक भारतीय संगीतप्रेमींच्या मनात निर्माण केलेले अढळ स्थान कायम राहील. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा असंख्य पुरस्कारांच्या मानकरी आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली
अत्यंत हृदयस्पर्शी आणि चिरतरुण आवाज लाभलेल्या आशा भोसले यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, “भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भावना व्यक्त केल्या.
