scorecardresearch

Premium

शरद पवारांनी गौतम अदाणींना दिला होता ‘तो’ सल्ला; स्वत: आत्मकथेत केला उल्लेख; म्हणाले, “मी त्यांना सुचवलं होतं की…!”

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथनात गौतम अदाणींविषयी नेमकं काय लिहिलं आहे याचा हा खास आढावा…

Sharad Pawar Biography Gautam Adani
शरद पवार यांनी आत्मकथेत गौतम अदाणींविषयी काय लिहिलं याचा आढावा… (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडेनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर झालेल्या टीकेवर भाष्य केलंय. हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य केल्याचा आरोप शरद पवारांनी केला. तसेच संसेदत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अदाणी-हिंडेनबर्ग अहवालावर चर्चा झाल्याचाही आरोप केला. यानंतर जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या राजकीय आत्मकथनात गौतम अदाणींविषयी नेमकं काय लिहिलं आहे याचा हा खास आढावा…

शरद पवार आपल्या राजकीय आत्मकथनाच्या पान क्रमांक १२३ वर लिहितात, “गौतम अदाणी या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा बोलबाला झाला आहे. या तरुण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो आहे. कमालीचा कष्टाळू आणि साधा! शून्यातून त्यानं आपलं आजचं साम्राज्य उभं केलं आहे. लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करण्यापासून या माणसाच्या उद्योजकतेला सुरुवात झाली. यानंतर काही छोटे व्यवसाय सुरू करून गौतम यांनी काही पैसे गाठीला बांधले. मग तो हिऱ्यांच्या व्यवसायात पडला. तिथेही पैसे मिळत होते, पण गौतम यांना त्याच्यात रस नव्हता. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगात पडण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती.”

supriya sule denies contact of praful patel with sharad pawar
शरद पवारांशी नित्य संपर्काचा प्रफुल्ल पटेलांचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला
chandrasekhar bawankule target prithviraj chavan in akola
कराड : उदयनिधींच्या ‘त्या’ वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी भाष्य करावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे आव्हान 
What Nitin Gadkari Said?
“फुकट मदत केली लोकांना वाटतं, हा मंत्री आहे याच्याकडे हरामाचा पैसा…”; नितीन गडकरींचं वक्तव्य
rahul narwekar asim sarode
“अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले…

“गौतम अदाणींनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं”

“यामधल्या काळात त्यांनी बंदर उभारणीचा पुष्कळ अभ्यास केला. गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेलांचे आणि त्यांचे चांगले संबंध होते. त्यांनी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची सीमारेषा नजीक आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम यांना दिली. गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हे शिवधनुष्य पेललं. आज ५० हजार एकर जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वांत मोठं आणि अद्ययावत बंदर आहे”, अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे.

हेही वाचा : “हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचं दिसतं, या कंपनीचं नावही…”, शरद पवारांचं मोठं विधान

“मी अदाणींना ऊर्जानिर्मिती क्षेत्रात उतरा असं सुचवलं”

शरद पवार पुढे लिहितात, “गौतम नंतर कोळसा पुरवण्याच्या व्यवसायातही आले. मी गौतमना सुचवलं, ‘वीज प्रकल्पांसाठी कोळसा पुरवण्याबरोबर ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातही तुम्हीच उतरा.’ एकदा प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया इथे गौतम आणि मी एकत्र होतो. त्यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा जिल्ह्यात उद्योजकांनी गुंतवणूक करण्यासाठी शरद पवार यांनी मदत करावी, अशी भावना व्यक्त केली. मी म्हणालो की, उद्योग येतील, पण तुम्हालाही सहकार्य करावं लागेल. आज गौतम अदाणी आले आहेत. त्यांनी मी विनंती करतो, की ऊर्जानिर्मितीसाठी या परिसरात त्यांनी प्रकल्प उभा करावा.”

हेही वाचा : “संसदेत महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष करून अदाणी-हिंडेनबर्ग विषयावर चर्चा”, शरद पवारांचा राहुल गांधींवर निशाणा, म्हणाले…

“रात्रंदिवस काम करणारा उद्योजक जमिनीवर पाय ठेवून”

“गौतमनीही त्यांच्या भाषणात माझ्या विनंतीला विधायक प्रतिसाद दिला. सर्वसाधारणपणे व्यासपीठांवरच्या वक्तव्यांतून फार काही घडतंच असं नाही. पण गौतमनी हा विषय लावून धरला. त्यानं भंडाऱ्यात ऊर्जानिर्मिती प्रकल्प मार्गी लावला. प्रकल्प पूर्ण झाल्यावर तेथून तीन हजार मेगावॅट वीजनिर्मिती होईल. गौतम यांनी ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली. आज जवळपास बारा हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे त्यांचे प्रकल्प उभारणीच्या प्रक्रियेत आहेत. रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक जमिनीवर पाय ठेवून आहे”, असंही पवारांनी नमूद केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar praise gautam adani in his political biography know what pbs

First published on: 08-04-2023 at 07:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×