Sharad Pawar NCP Foundation Day: पुणे येथे आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा २६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. सकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. तर बालेवाडी क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत आहे.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी खासदार शरद पवार यांचे कौतुक केले आहे. यावेळी सुनील तटकरे म्हणाले, “पवार साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक लोकप्रिय निर्णय घेतले आहेत. यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामकरण करण्याचा निर्णय आणि मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी यांचा समावेश आहे. या देशात पहिले वहिले महिला धोरण कोणी आणले असेल, तर ते शरद पवार यांनीच आणले, याचा उल्लेख मी करू इच्छितो.”
यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचेही कौतुक केले. तटकरे म्हणाले, “अजित दादांवर प्रचंड टीका झाली. पण, मराठवाड्यात कृष्णेचे पाणी नेण्याचे काम एकमेव अजित पवार यांनी केले आहे. मला मराठवाड्यातील जनतेला आणि आमदारांना सांगयचे आहे की, आज मराठवाड्यात जे बॅरेज उभे आहे ते अजित दादांमुळे आहेत. त्यातून आज मराठवाडा सुजलाम सुफलाम होण्याच्या टप्प्यावर पोहचला आहे.”
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुमारे ४० आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. अशात या चर्चांना गेल्या काही दिवसांमध्ये आणखी जोर आला होता.
याच मुद्द्यावर बोलताना आज सकाळी सुनील तटकरे म्हणाले होते की, “निवडणुकीत आमचा स्ट्राइक रेट जास्त होता. त्यामुळे एकत्र येण्याबाबत ज्याच्या त्याचा विचार वेगळा असू शकतो. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही.”
दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते प्रशांत जगताप यांनी, “आम्ही त्यांच्याकडे जाण्याचा कोणताच प्रश्न नाही. जर त्यांनाच आमच्याकडे यायचे असेल तर त्यांनी भाजपाची साथ सोडावी आम्ही त्यांचे स्वागत करू”, असे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान म्हटले होते.