विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अटीशर्तीबाबत मोठी घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला होता, त्या शेतकऱ्यांचं ५० हजारांऐवजी आता २ लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं शरद पवारांनी देखील कौतुक केलं आहे. दरम्यान, शरद पवारांनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मी विधानसभेत सांगितलं की, याआधी झालेल्या कोणत्याही कर्जमाफीच्या योजनेत लगतच्या कर्जमाफीत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला नव्हता. पण आपण पहिल्यांदा हा निर्णय केला. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता, त्यांना आधी आपण ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देणार होतो. मात्र, सत्ताधारी सर्व आमदारांचा आग्रह होता की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्या, आपण देखील ती मागणी मान्य केली. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.

मुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांचे मानले आभार

महायुती सरकारने कर्जमाफी योजनेतील दोन जाचक अटी रद्द केल्याबद्दल शरद पवार यांनी सरकारचं कौतुक केलं, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “शरद पवारांनी कौतुक केलं, त्याबाबत मी त्यांचा आभारी आहे.”

शरद पवारांकडून सरकारचं कौतुक

“सततची नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मात्र, सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने २०१९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२५-२६, २०२६-२७ चे पीककर्ज भरण्याची घातलेली अट, यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता. पण राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेता आज शासनाने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, त्याबद्दल सरकारचे आभार”, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

“या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना व त्यांचे नेते, राजकीय पक्ष व त्यांचे नेते तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन”, असं म्हणत शरद पवार यांनी रोहित पवार यांचंही कौतुक केलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील कोणती अट रद्द?

“आता ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांना ५० हजार रुपयांची अट घातली होती. त्या माध्यमातून ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार होता. मात्र, आता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही थेट २ लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर २०२६-२७ चा कर्ज भरण्याच्या संदर्भातील नियम वगळण्यात येईल. गेल्या तीन पैकी दोन वर्षात ज्यांनी पैसे भरले ते देखील आता कर्जमाफीसाठी पात्र होतील”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.