राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली. पूरग्रस्त भागांची पाहणी केली जात असून, पुराचा फटका बसल्यानंतर सरकारकडून काय घोषणा करण्यात येणार याकडे पूरग्रस्तांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. पूरग्रस्त भागातील मदतीसंदर्भात आणि पुनर्वसनाच्या कामाबद्दल शरद पवारांनी काही सूचना केल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जबाबादारी आहे, पण इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेत, असं आवाहन पवार यांनी केलं.

शरद पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी पवार यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातील पूरपरिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. “राज्याला पुराचा मोठा फटका बसला. पुरामुळे घरांचं व शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालंय. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे”, असं पवार यांनी सांगितलं. पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात येणाऱ्या मदतीची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर पूरग्रस्त भागात डॉक्टरांची पथकं पाठवणार असल्याचंही ते म्हणाले. पुराचा फटका बसलेल्या १६ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीट वाटल्या जाणार असल्याचंही पवार म्हणाले.

Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
Arvind kejriwal
केजरीवाल तिहार जेलमध्ये रामायणासह पंतप्रधानांबाबतचं ‘हे’ पुस्तक वाचणार, न्यायालयाकडे ‘या’ वस्तूंसाठी परवानगी अर्ज

पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे सुरू असून, त्यावर शरद पवार यांनी भाष्य केलं. पवार म्हणाले, “पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे”, असं पवार म्हणाले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनाही दौऱ्यावर येऊ नका म्हणून विनंती केली होती

“माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझं अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पूनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा. मला आठवतं की, लातूरला असताना आम्ही कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव पाहणीसाठी येणार होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला आणि त्यांना येऊ नका अशी विनंती केली. दहा दिवसांनी या असं त्यांना म्हणालो. तुमच्या इथली यंत्रणा तुमच्याभोवती केंद्रीत होईल असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनीही दौरा रद्द केला”, असं सांगत पवार यांनी पूरग्रस्त भागात दौरे न करण्याचं आवाहन राजकीय नेत्यांना केलं.