गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६ हजार २११ खासगी कंपन्या बंद झाल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खासगी कंपन्या बंद झाल्याने जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच वाहतूक कोंडीला कंटाळून चाकणमधील जवळपास २० कंपन्यांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. यावरही शरद पवार यांनी भाष्य करत सरकारकडे चार मोठ्या मागण्या केल्या आहेत.

चाकण औद्योगिक वसाहतीतील २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची ही बाब अत्यंत गंभीर आहे. याचा रोजगारावर मोठा परिणाम होण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारने यावर तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शरद पवार यांनी केली. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

शरद पवार यांनी काय म्हटलं?

“चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे २,००० हून अधिक कामगार कार्यरत आहेत. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सरकारकडे केल्या चार मागण्या

  • चाकण, तळेगाव आणि राज्यातील अन्य औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करावा.
  • खड्डे, रस्ते आणि वाहतूक कोंडीची समस्या सरकारने तातडीने सोडवावी.
  • एमआयडीसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी आणि एनएचएआय यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात.
  • उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारावी, अशा मागण्या शरद पवार यांनी केल्या आहेत.

‘हे अत्यंत धक्कादायक आहे’ : शरद पवार

“तसंच संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील आमचे सहकारी खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्याच्या औद्योगिक धोरणासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी संसदेत माहिती दिली की, गेल्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ३६,२११ खासगी कंपन्या बंद झाल्या आहेत. मात्र या कंपन्या बंद झाल्यानंतर किती जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना पुरेसा मोबदला मिळाला का? याची माहिती सरकारदरबारी उपलब्ध नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राज्य राहिलं आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाही. सरकार कोणत्याही विचारांचं असो, ‘औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र’ हा स्व. यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.