Sharad Pawar Rajya Sabha Oath updates Supriya Sule Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. राज्यातील सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आली होती. दरम्यान पवारांनी संसदेत शपथ घेतल्यानंतर त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक खास पोस्ट केली आहे.

लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात मिळून शरद पवार हे नवव्यांदा खासदार बनले आहेत. यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये कृतज्ञता व्यक्त केली आहे, तसेच त्यांनी शरद पवार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार सुप्रिया सुळे आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाल्या की, “कृतज्ञ… आदरणीय पवार साहेब यांनी आज राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी यावर्षी संसदीय कारकीर्दीची ५९ वर्षे पूर्ण केली असून त्यांनी आता ६० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांनी यापुर्वी सहा वेळा विधानसभेत, एकदा विधानपरिषदेत, सात वेळा लोकसभेत तर राज्यसभेत दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. यावर्षीपासून सलग तिसरी टर्म ते राज्यसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत.”

“सन १९६७ साली सुरू झालेला हा अविजीत प्रवास आजही कायम सुरू आहे. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय तथा संसदीय अनुभवाचा देशाला नेहमीच फायदा होईल हा विश्वास आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा, असेही सुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या जनतेचेही आभार मानले आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, “यासोबतच या संपूर्ण प्रवासात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणारी, त्यांच्यावर नितांत प्रेम करणारी बारामतीची जनता, संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक आणि देशभरातील जनतेचे मनापासून आभार. आपण साहेबांना दिलेली साथ आणि दिलेले प्रेम ही आमच्यासाठी अमूल्य असा ठेवा आहे. मनापासून धन्यवाद…”

देशातील सर्वात तरुण लोकनेता…

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते शरद पवार यांनी देखील शरद पवारांचा शपथ घेतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “देशातील सर्वांत ‘तरुण’ लोकनेता..! हा क्षण आपल्या सर्वांसाठीच केवळ भावनिकच नाही तर अभिमानास्पदही आहे…!” असं कॅप्शन रोहित पवारांनी या व्हिडीओला दिले आहे.