सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी सहकार क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. मात्र, अलीकडची पिढी सहकाराचा हात सोडून खासगी कारखानदारीकडे वळली असल्याची खंत ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी येथे बोलताना व्यक्त केले.पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी लिहिलेल्या ‘सहकार सेतू -खंड एक’ या पुस्तकाचे प्रकाशन खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्राने राज्याभर सहकाराचा आदर्श घालून दिला. या भागातील सहकारी संस्था, कारखाने हे आजवर सर्वांसाठी आदर्श राहिले. मात्र आता याच सहकारातील अग्रणी असणाऱ्या नेत्यांची पुढची पिढी मात्र खासगीकडे वलू लागली आहे. या प्रत्येकाने सहकारातून काही निर्माण करण्याऐवजी प्रत्येकाने खासगी कारखानदारी सुरू केली आहे, याबद्दल खंत वाटते. डॉ. प्रताप पाटील यांच्या सहकार सेतू या ग्रंथातून व्यक्त झालेले विचार सहकाराला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. सहकार सेतूच्या एका खंडानंतर त्यांनी न थांबता आपले लेखन आणि संशोधन कार्य असेच पुढे चालू ठेवण्याचे आवाहन यावेळी पवार यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रंथाचे लेखक डॉ. पाटील म्हणाले, सहकारात स्वार्थाचा कोणताही हेतू न ठेवता सहकार चळवळ समृद्ध व्हावी यासाठी राज्य सहकार संघापासून ते सांगली जिल्हा सहकार बोर्डापर्यंत गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहे. सहकारासाठी जे योग्य आहे त्याची मांडणी आणि जे अयोग्य आहे त्या चुकांचे निर्देशन करण्याचे काम सहकारी जगत आणि ‘सहकारी महाराष्ट्र’ या मासिकातून करीत आहे. ही चळवळ समृद्ध व्हावी यासाठी भविष्यातही प्रयत्नशील राहील. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सुरज चौगुले यांनी केले. तर आभार पुणे सहकार बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर यांनी मानले.