Sharad Pawar जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. अजित पवार ४२ आमदारांचा एक गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत रंगला. बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या होत्या. ही लढाई सुप्रिया सुळेंनी जिंकली. मात्र त्यानंतर आलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी कांँग्रेस पक्षाने तुफान यश मिळवलं. तसंच महायुतीला २३७ जागा मिळाल्या. महायुतीचा विजय झाल्यापासूनच अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेसह शरद पवार, अजित पवार एकत्र येतील अशाही चर्चा सुरु होत्या. मात्र वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी पक्षातील फुटीबाबत भाष्य केलं.
आपल्या पक्षात फूट पडली आहे पण…-शरद पवार
आपल्या पक्षात फूट पडली, फूट पडावी असं काही वाटत नव्हतं पण फूट पडली. काही मुलभूत विचारांमध्ये फरक झाला आणि फूट पडली. जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील तेव्हा वेगळं चित्र बघायला मिळेल. १९८० मध्ये माझ्या हाती सत्ता होती. त्यावेळी निवडणूक झाली होती आणि ५० ते ५२ आमदार निवडणून आले. पुढच्या सहा महिन्यात ६ आमदारच शिल्लक राहिले. बाकी सगळे ५० ते ५२ आमदार सोडून गेल होते. त्यानंतर जी निवडणूक आली तेव्हा राष्ट्रवादीची संख्या ७२ झाली. राज्य सरकारमध्ये काम करता आलं. त्यामुळे फुटीची चिंता करु नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं आहे.
जयंत पाटील यांचं शरद पवारांनी केलं कौतुक
जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की नव्या पिढीला संधी द्या. आम्ही सगळ्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेऊ. हा निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात नवीन पिढी, नवे चेहरे दिसले पाहिजेत. कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते आपल्या पक्षात आहेत. त्यांना संधी देऊ, प्रतीष्ठा देऊ आणि राज्य चालवणारं नेतृत्व आपण घडवलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. पुढचे तीन महिने तुमचं लक्ष त्यावर असलं पाहिजे. कर्तृत्ववान लोकांना संधी द्या. आपण येत्या तीन महिन्यांत होणाऱ्या निवडणुकीच्या नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.