देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवार यांनी NDA सोबत यावं. शरद पवार केंद्रीय मंत्रिमंडळात आले तर त्यांचा अनुभव देशासाठी मोलाचा ठरणार आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या फायद्यासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यावं असं माझं व्यक्तिगत मत आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणूक भाजपाने स्वबळावर लढवली असती तर भाजपाला १४० जागा मिळाल्या असत्या. काही जागा कमी पडल्या असत्या तर आम्हीच शरद पवार यांना विनंती केली असती असंही रामदास आठवलेंनी म्हटलंय. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

आणखी काय म्हणाले आहेत रामदास आठवले?
राज्यात शिवसेनेच्या दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आहे. शिवसेनेच्या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढायला हवा. राज्यात अनेक निर्णयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी करुन घेतलं जात नाही. या संपूर्ण प्रक्रियेवर मुख्यमंत्र्यांचा कंट्रोल आहे. राज्यात तीन पक्षांचं सरकार असलं तरीही शिवसेना इतर दोन पक्षांचं ऐकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढून घ्यावा. देशाच्या भल्यासाठी आणि राज्याच्या भल्यासाठी शरद पवारांनी एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भवितव्यासाठी शरद पवार यांनी शिवसेनेसोबत राहू नये असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे चित्र चिंताजनक आहे. सामना पेपर चालवणं सोपं आहे मात्र करोनाचा सामना करणं सोपं नाही हेदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्षात आलं आहे. आज देवेंद्र फडणवीस असते तर रस्त्यावर उतरले असते. सध्याचे मुख्यमंत्री घरात बसून फक्त आदेश देण्यात मग्न आहेत. अशाने परिस्थितीवर नियंत्रण कसे आणणार? ठाकरे सरकारला करोनावर मात करण्यात अपयश आलंय असंही आठवलेंनी म्हटलं आहे.