Supriya Sule Reply Prithviraj Chavan Sharad Pawar NDA Rumours: राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेस पक्ष एनडीएबरोबर जाण्याची अटकळ गेल्या काही दिवसांपासून बांधली जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी आणि केंद्र सरकारविरोधातील काही प्रश्नांसंदर्भातली मवाळ भूमिका यावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एनडीएबरोबर न जाता इंडिया आघाडीबरोबरच राहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएबरोबर हातमिळवणी करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. शरद पवार हे विचारांनी डावीकडे झुकलेले नेते आहेत. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर त्यांचा विश्वास आहे. त्यांनी मनुस्मृती माननाऱ्या लोकांबरोबर जाऊ नये.”
सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर
मनुस्मृती विचारसरणी माननाऱ्या लोकांशी हातमिळवणी करू नये, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नेहमीच चुकीच्या चौकटीत बसवतात. कदाचित इथल्या नेत्यांचे केंद्रातील नेत्यांशी योग्य समन्वय नसल्यामुळे हे घडत असावे.”
द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एनडीएच्या हातमिळवणीविषयी प्रश्न विचारला असताना आपण शरद पवारांविषयी भाष्य केले होते. दरम्यान केंद्रातील सरकारमध्ये पुढील काळात निश्चितच बदल होतील, असाही अंदाज त्यांनी वर्तवला.

‘अमित शाह यांना उपपंतप्रधान व्हायचे आहे’
“केंद्र सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. येत्या काळात देशात निश्चितच सत्तांतर होईल. हे काँग्रेसमुळे किंवा इतर राजकीय पक्षामुळे होईल का? हे आताच सांगणे कठीण आहे. पण सत्तांतर हे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होईल. याचे कारण म्हणजे गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय. त्यामुळे २०२९ मध्ये पंतप्रधान मोदी हे या पदावर राहणार नाहीत. त्यामुळे अमित शाह हे आतापासून उपपंतप्रधान म्हणून त्यांना जाहीर करावे, अशी मागणी करत आहेत”, अशीही प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
‘२०१४ साली मविआचा प्रस्ताव होता’
२०१९ साली महाविकास आघाडीचा प्रयोग करत शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. हा प्रयोग २०१४ सालीच होणार होता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, “२०१४ साली भाजपा वगळून तीन पक्ष एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. डिसेंबर २०१४ साली हा प्रस्ताव समोर आला होता, मात्र मी त्यावेळी त्याला विरोध केला. शिवसेनेबरोबर जाणे आमच्या पक्षाला मान्य होणारच नाही, असे त्यावेळी म्हणालो होतो.”
२०१९ साली परिस्थिती बदलली
२०१४ साली मविआला विरोध केला असला तरी २०१९ साली मात्र आपणच मविआ होण्यासाठी पाठिंबा दिला, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “याचे कारण सांगत असताना ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्याप्रकारे राज्य केले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे १७५ नेते फोडले, ईडी-सीबीआयची भीती दाखवून कारखानदारांमध्ये दहशत निर्माण केली. फडणवीस यांना रोखले नाही तर ते आणखी फोडाफोडी करतील. यामुळे २०१९ साली आम्ही मविआला पाठिंबा दिला”, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
