Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात खुद्द अजित पवार यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली होती, असेही दावे केले जात आहेत. किंबहुना १२-१३ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याचंही ठरलं होतं असं खुद्द शरद पवारांकडून सांगण्यात आल्यामुळे त्याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या चर्चा फेटाळल्यानंतर नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय घडतंय? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या सर्व चर्चेवर शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना सविस्तर भाष्य केलं आहे.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत काय म्हणाले शरद पवार?
पत्रकार परिषदेत शरद पवारांना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी शरद पवारांनी त्यावर त्रोटक शब्दांत उत्तर दिलं. “शपथविधीवर मला भाष्य करायचं नाहीये. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, आनंद आहे”, एवढंच ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असत्या, तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना विचारणा केली. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, तर शरद पवार महायुतीला पाठिंबा देणार होते का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याबाबतही त्यांना विचारण्यात आलं. त्यावेळी शरद पवारांनी सूचक शब्दांत उत्तर दिलं.
“राजकीय मुद्द्यांवर आम्ही कुणाशीही चर्चा करत नाही”
“मुख्यमंत्र्यांना माझा उल्लेख करण्याचा काय अधिकार आहे काही समजलं नाही. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना यावर भाष्य करण्याचा काय अधिकार आहे मला कळलं नाही. आमचे सहकारी जयंत पाटील व अजित पवार यावर चर्चा करत होते. यापेक्षा अधिक काहीच नाही”, असं शरद पवार म्हणाले. “आत्ता परस्परांना धीर देण्याची वेळ आहे. राजकीय मुद्द्यांवर आम्ही कुणाशीही चर्चा करत नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?
“चर्चा कुठल्याही अंतिम टप्प्यावर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं. आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर त्यांनी आम्हाला सांगितलं असतं. ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी या गोष्टी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
अजित पवारांचं स्मारक बारामतीत, मला कसं माहिती नाही – शरद पवार
दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवारांचं स्मारक बांधलं जात असून खुद्द शरद पवारांनी तिथे जागेची पाहणी केल्याचा दावा केला जात आहे. या चर्चेबाबत विचारलं असता शरद पवारांनी हे वृत्त फेटाळून लावलं. “अजित पवारांचं स्मारक बारामतीत होतंय ही गोष्ट मला माहिती नाही. ज्या संस्थेच्या जागेबाबत काही लोकांनी चर्चा केली, त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्यामुळे या बाबतीत मला तरी माहिती असायला हवी. पण आम्ही त्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. त्याबाबत काय करायचं हे आम्ही सगळे लोक एकत्र बसून निर्णय घेऊ. पण तसं काहीही नसताना त्यावर भाष्य करणं योग्य नाही”, असं ते म्हणाले.

