Sharad Pawar Press Conference: गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे यासंदर्भात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. राज्य सरकार व आंदोलकांमध्ये वारंवार चर्चा होऊनही यावर अद्याप सर्वमान्य तोडगा निघालेला नाही. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकांमद्ये हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असताना शरद पवार यांनी यासंदर्भात त्यांची भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी स्वत:च्या एका चुकीचाही उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आरक्षणाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय? अशी विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली. त्यावेळी मराठवाड्यातील परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.

मराठा आरक्षणावर काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या वादामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर यावेळी भाष्य केलं. “काल मला मराठा नेत्यांचं एक शिष्टमंडळ भेटून गेलं. आरक्षणाच्या बाबतीत कुणाचाही मतभेद असण्याचं कारण नाही. मला काळजी या गोष्टीची आहे की यामुळे दोन वर्गांमध्ये एक प्रकारचं अंतर वाढतंय अशी स्थिती दिसू लागली आहे. विशेषत: मराठवाड्यातल्या दोन-तीन जिल्ह्यांमध्ये अधिक काळजी घेण्याची गरज आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“मला काही सहकाऱ्यांनी सांगितलं की तिथे एखाद्या ठिकाणी अमुक समाजाच्या व्यक्तीचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाच्या व्यक्ती तिथे जात नाहीत. हे जर खरं असेल तर ही स्थिती चिंताजनक आहे. हे बदलायला हवं. त्यासाठी आमच्यासारख्यांनी अधिक लक्ष द्यायला हवं. संसदेचं अधिवेशन संपल्यावर सुसंवाद साधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत”, असं म्हणत शरद पवारांनी यावेळी या विषयावर सर्वपक्षीय व सर्व बाजूंनी मिळून प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

शरद पवारांनी सांगितली ‘ती’ चूक!

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी ते मुख्यमंत्री असताना घेतलेल्या एका निर्णयाचा उल्लेख केला. “मी विद्यापीठ नामांतराचा निर्णय घेतला तेव्हा हा निर्णय मी विधानसभा सदस्यांशी चर्चा करून मुंबईत घेतला. पण त्याचे पडसाद मात्र बाहेर उमटले. त्याची किंमत काही गरीब लोकांना मोजावी लागली. तेव्हा माझ्या लक्षात माझी चूक आली. माझी चूक अशी होती की मी मुंबईत बसून निर्णय घेतला आणि त्यात ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी मी संवाद साधला नाही”, असं शरद पवार म्हणाले.

“…तर लोकसभेसारखी स्थिती दिसू शकेल”, विधानसभेसाठी शरद पवारांनी मांडलं राजकीय गणित; म्हणाले, “आजच्या राज्यकर्त्यांना…”

“त्यानंतर मी सगळी कामं बाजूला ठेवून मराठवाड्यातल्या सगळ्या महाविद्यालयांमध्ये स्वत: गेलो. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर वर्ष-दोन वर्षांनी त्याच निर्णयाला लोकांनी संमती आणि सहमती दाखवली. आज मराठवाड्यात काही ठिकाणी नव्या पिढीशी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुसंवाद साधण्याची गरज आहे. ते काम आम्ही नक्की करू”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“जरांगेंनी एक चांगलं वक्तव्य केलंय. ते म्हणाले की मराठा आरक्षणाच्या सोबतीनेच लिंगायत, धनगर व मुस्लीम यांनाही आरक्षण द्यावं. माझ्या मते दोन समाजांमधलं अंतर निर्माण होण्याच्या सध्याच्या स्थितीत योग्य दिशेनं प्रक्रिया सुरू झाली आहे. इतर समाजही त्यात आले तर दोन समाजांमध्ये कटुता राहणार नाही. सरकारला आम्ही सुचवलं की तुम्ही मनोज जरांगे व त्यांच्या सहकाऱ्यांना चर्चेला बोलवा. त्यासोबत छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा. आमच्यासारख्या लोकांची काही मदत होणार असेल तर त्यांनाही बोलवा. यातून एकवाक्यता निर्माण करण्यासाठी आपण सामुहिक प्रयत्न करू”, असं शरद पवारांनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar stand on manoj jarange patil maratha reservation protest pmw
Show comments