बारामतीची पोटनिवडणूक २३ एप्रिलला होणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची ही जागा रिक्त झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सुनेत्रा पवार उभ्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र काँग्रेसने या निवडणुकीसाठी उमेदवार दिला आहे. दरम्यान अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काँग्रेसला सल्ला दिला. पण त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांचं वक्तव्य काय?
बारामतीची पोटनिवडणूक अविरोध करणं हे योग्य राहिल. मी काँग्रेसला इतकाच सल्ला देईन. पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो काँग्रेसचा निर्णय आहे. आम्ही काही त्यांना फार सांगू शकत नाही. निर्णय त्यांना घ्यायचा आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे असं म्हटलं होतं. दरम्यान आज माध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांनी काँग्रेसला निवडणूक अविरोध करण्याचा सल्ला दिला आहे.
सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य काय?
“रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांची भेट झाली. रोहितने मनापासून दिलगिरी व्यक्त केली. पार्थ पवारांकडून जे वक्तव्य झालं त्याबाबत रोहितने दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेस माघार घेईल का? याबाबत मला काही बोलता येणार नाही.” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मीडियाकडून माहिती घेऊन या प्रकरणी सर्वात जास्त पाठपुरावा कुणी केला असेल तर तो रोहित पवार यांनी केला आहे. तसंच संसदेत हा प्रश्न सातत्याने मांडण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलं आहे. रोहित पवारांनी जो पाठपुरावा केला त्या सगळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं. मात्र या प्रकरणाचा म्हणावा तसा पाठपुरावा झालेला नाही असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंं आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
१५ मार्च रोजी बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर ५ एप्रिलपर्यंत कुणीही संपर्क साधला नाही. याचा अर्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाला या निवडणुकीशी काही घेणंदेणं नव्हतं असा घ्यायचा का? इतके दिवस त्यांनी संपर्क का केला नाही? त्यांचे काही खासदार दिल्लीत आहेत. त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठींशी संपर्क साधला नव्हता. भाजपाकडेच मोठा भाऊ म्हणून त्यांनी सूत्रं सोपवली होती का? असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आम्ही निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर मी आमच्या आदरणीय नेत्यांच्या संपर्कात आहे. सगळ्यांशी संपर्कानंतर पुढची भूमिका काँग्रेस पक्ष स्पष्ट करेल असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
