Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी त्यांच्या राजकीय जीवनातील किस्से आणि प्रसंग सांगत असतात. अशातच त्यांनी आता त्यांचा खिसा कापण्यासंदर्भातला एका भन्नाट किस्सा सांगितला आहे. त्यांनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये जोरदार हशाही पिकला. शरद पवार हे रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ समाजसेवक मोतीराम राठोड यांच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.

हेही वाचा – Sharad Pawar : बुद्धीबळातला सर्वात आवडता सैनिक कोणता? उंट, घोडा, हत्ती की वजीर? शरद पवार म्हणाले…

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

“काही वर्षांपूर्वी मी चाळीसगावमध्ये एका अधिवेशनासाठी गेलो होतो. त्यावेळी आयोजकांनी मला सांगितले की यावेळीच्या अधिवेशनाचं वैशिष्ट म्हणजे, यंदा या भागातील सर्व गुन्हेगार याठिकाणी एकत्र जमले आहेत. मी त्यांना गमतीने विचारलं की या गुन्हेगारांचं असं काय वैशिष्ट आहे? ते म्हणाले, तुम्हाला हे वैशिष्ट बघायचं असेल तर ते या अधिवेशनाच्या ठिकाणीच बघायला मिळेल”, असं शरद पवार म्हणाले, असं शरद पवार म्हणाले.

“…अन् माझा खिसा कधी कापला गेला, मलाही कळलं नाही”

पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “मी अधिवेशनाच्या ठिकाणी पोहोचलो, तेव्हा त्यांनी मला तिथल्या गुन्हेगारांची ओळख करून दिली. अमुक व्यक्ती खिशा कापतात, तमुक व्यक्ती हा गुन्हा करतात, वगैरे असं वैशिष्ट त्यांनी मला सांगतिले. मी त्यांना विचारलं की हे खिसा कापतात का? ते म्हणाले हो, मग ज्याचा खिसा कापला जातो, त्यांना कळत नाही का? तेव्हा ते मला म्हणाले की तुमच्या खिशात हात घाला, मी खिशात हात घातला तेव्हा हात सरळ खाली गेला. माझा खिसा कधी कापला मला कळलंच नाही. मुळात हे स्किल समाजातील काही घटकांमध्ये परिस्थितीमुळे आलं ”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची भूमिका काय? शरद पवार स्पष्टच म्हणाले…

दरम्यान, शनिवारी शरद पवार यांनी एपीबी माझा या वृत्तावाहिनीला मुलाखत दिली. यावेळीही त्यांनी अनेक गमतीशीर प्रसंग सांगितले. विशेष म्हणजे बुद्धीबळ खेळाचा राजकारणात फायदा होतो का? असा प्रश्नही शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना, अनेक जण म्हणतात की बुद्धीबळ चांगला खेळतो. मात्र, असं काही नाही. गंमतीने कधी वेळ मिळाला तर खेळायला बसतो. याच्यात दोन तीन गोष्टी असतात, उंट तिरकाच चालतो, राजकारणा उंट कोण हे लक्षात ठेवावं लागतं. घोडा अडीच घरं चालतो, तर अडीच घरं चालणारा घोडा आपल्या बाजुने कोण आहे? ते बघावं लागतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. पुढे बोलताना बुद्धीबळाच्या पटावरील आवडता सैनिक कोणता असं विचारलं असता, मला वजीर आवडतो, असं शरद पवार यांनी सांगितले.