“येऊ नका…” एवढ्या दोन शब्दांमध्ये जेव्हा पवारांनी पंतप्रधानांना पाठवला होता निरोप

राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागातले दौरे टाळण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

Sharad-Pawar-PTI5-1
शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत आपला किल्लारी भूकंपावेळचा अनुभव सांगितला आहे.

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस झाल्यानं पूरपरिस्थिती उद्भवली. पूरग्रस्त भागांची पाहणी केली जात आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक राजकीय नेतेही आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली आहे.  यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याबद्दलही भूमिका मांडली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागातले दौरे टाळण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी आपण पंतप्रधानांनाही आपला दौरा रद्द करण्याची विनंती केली होती, असंही सांगितलं. शरद पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली.  त्यावेळी हा किस्सा सांगताना पवार म्हणाले, “माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझं अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा. मला आठवतं की, लातूरला असताना आम्ही कामात होतो. त्यावेळी पंतप्रधान नरसिंहराव पाहणीसाठी येणार होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना फोन केला आणि त्यांना येऊ नका अशी विनंती केली. दहा दिवसांनी या असं त्यांना म्हणालो. तुमच्या इथली यंत्रणा तुमच्याभोवती केंद्रीत होईल असं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनीही दौरा रद्द केला.”

हेही वाचा -पूरग्रस्त भागातील दौरे टाळा; शरद पवारांचं राजकीय नेत्यांना आवाहन

“पूरग्रस्त भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांनी दौरे केले. त्यांचे दौरे लोकांना धीर देण्यास उपयोगी पडतात. त्यामुळे या नेत्यांच्या दौऱ्यावर आमची हरकत नाही. पण, मला असं वाटतं की, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी दौरे करून कामात सुसूत्रतेवर लक्ष दिलं पाहिजे”, असं पवार म्हणाले. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले, तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो. पुनर्वसनाच्या कामावरुन लक्ष विचलित होतं म्हणून मला असं वाटतं की, माझ्यासारख्या इतर नेत्यांनी असे दौरे करणं टाळायला हवं”, असं पवार यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sharad pawar when he told prime minister not to come vsk

ताज्या बातम्या