Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. शरद पवार यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. तसेच राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची मागणी केली असल्याचेही त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे.
शरद पवार यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?
महाराष्ट्र राज्यात ३२ लाखाहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अहोरात्र अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया वेळेवर व्हावी तसेच वेळेवर नियुक्त्या मिळाव्यात हीच एकमात्र अपेक्षा असते. परंतु सद्यस्थितीत रखडलेल्या नियुक्त्या, अनेक परीक्षांच्या प्रलंबित असलेल्या जाहिराती, परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यास होत असलेला विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष आहे, असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा – “केंद्रातील सरकार शेतकरीविरोधी”, शरद पवार यांची शिंदखेड्यातील मेळाव्यात टीका
विद्यार्थ्यांच्या मागण्याही मांडल्या
पुढे या पत्रात त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्याही मांडल्या आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये नियोजित असलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या दिवशी IBPS परीक्षा येत असल्याने राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी तसेच राज्यसेवेच्या परीक्षेत कृषीच्या २५८ जागांचा समावेश करावा या मागण्यांसाठी पुणे येथे स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आयोगाने अद्यापही परीक्षा नेमकी कधी घेण्यात येईल याबाबत तसेच कृषी सेवेच्या जागांबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. पुढे ऑक्टोबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने या संदर्भात त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
याशिवाय, आचारसंहिता लागण्यापूर्वी संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब, गट-क) या परीक्षेची तारीख जाहीर करणे, तसेच राज्यसेवा, कृषी सेवा, पोलिस उपनिरिक्षक, विक्रीकर सहाय्यक वगैरे सरळ सेवेतील अनेक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळणे, न्यायालयीन प्रकरणांत अडकलेल्या भरती प्रक्रियेबाबत निर्णय घेणे आणि शिक्षक, प्राध्यापक भरतीला गती देणे, अशी मागणी विद्यार्थ्यांची असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. पुढे बोलताना, या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण भेटीची वेळ द्यावी, अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे.