मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात गेल्या १५ दिवसांपासून देशातील विविध राज्यात मोठी आंदोलनं सुरू आहेत. दिल्लीत एकापाठोपाठ आंदोलनं सुरू आहेत. काँग्रेस, इंडिया आघाडी तसंच कॉक्रोच जनता पार्टीने गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीत लागोपाठ आंदोलनं करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान आता मनसेच्या नेत्या आणि राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली आहे.

ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच लोक निवडून येतात-शर्मिला ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी जेजुरी मध्ये बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती भाष्य केलं आहे.“कामं आपण करतो, पण ज्ञानेश कुमार यांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; आता हे बंद करायचं आहे ” असं विधान शर्मिला ठाकरे यांनी केलं आहे. काम करणारे आणि निवडून येणारे यांच्यातील फरक सांगताना शर्मिला ठाकरे यांनी हे भाष्य केलं आहे. शर्मिला ठाकरे या जेजुरी मध्ये एका कार्यकर्त्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आल्या होत्या आणि त्यावेळी त्या बोलत होत्या.

जेजुरीच्या खंडेरायाला नवस बोला…

खरं काम करणाऱ्या माणसांसाठी आज तुम्ही जेजुरीच्या खंडेरायाला नवस बोला, असेही शर्मिला ठाकरे पदाधिकाऱ्यांसमोर म्हणाल्या. यंदा दुष्काळाचं मोठं संकट आहे. मी रस्त्यावर बघितलं सगळी पीकं जळून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाला देखील भाव मिळत नसल्याची खंत शर्मिला ठाकरे यांनी बोलून दाखवली. त्यांनी हे संकट दूर होण्यासाठी आई अंबेमातेला प्रार्थना करते असंही शर्मिला ठाकरेंनी म्हटलं आहे.