मुंबई : समरजीत घाडगे भाजपचेच होते, विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाची उमेदवारी त्यांना हवी होती, त्यामुळे ते आमच्याकडे आले होते. निवडणूक लढवून ते पुन्हा भाजपवासी झाले आहेत. त्यांना प्रवेश देऊन भाजपने महायुतीतील मित्र पक्षांना एक प्रकारे इशाराच दिला आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
घाडगे भाजपचेच होते, ते भाजपमध्येच गेले. त्यामुळे त्यांनी वेगळे काही केले नाही. भाजपने हा विद्यमान लोकप्रतिनिधी हसन मुश्रीफा यांना दिलेला इशारा आहे. भाजप २०२९ ची विधानसभा निवडणूक स्वःबळावर लढविणार आहे. भाजप नेते अमित शहा यांनी तसे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजप महायुतीतील मित्रपक्षांचा लोकप्रतिनिधी असलेल्या ठिकाणीच्या कार्यकर्त्यांनाही पक्षात प्रवेश देत आहे.
भविष्यकाळात सर्व निवडणुका स्वःबळावर लढविण्याचीच ही तयारी आहे, असेही शिंदे म्हणाले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान झालेली घटना महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी आहे. या घटनेविरोधात आमची मोर्चा काढण्याची तयारी आहे, पण, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांची भूमिका अद्याप समजू शकली नाही, असेही शिंदे म्हणाले.
